राजापूर शहराला 14 दिवसांपासून पुराचा वेढा कायम

गेल्या आठवड्यापासून संततधारेने लागणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला सलग 14 दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याने नदीकिनाऱ्या लगतच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातुन वाहणाऱ्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नदीकिनाऱ्यालगतची अनेक गावे व वाड्या पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्जुना नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून रायपाटण गांगणवाडीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. नाटे येथील ठाकरेवाडीचा संपर्क अद्यापही तुटलेलाच असुन प्रिंदावण तारळ भागातून वाहणाऱ्या सुक नदीच्या पाणी पातळीत वाढ होवुन मळेशेती गेले 14 दिवस पाण्याखाली राहिल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे .

गेले दोन आठवडे संततधारेने लागणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला गेले 14 दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. सातत्याने पुराच्या पाण्यात चढ उतार राहिल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अर्ध्याहून अधिक बाजारपेठ सातत्याने पुराच्या पाण्याखाली असल्यामुळे गेले पंधरा दिवस बाजारपेठ बंदच आहे. गेले चार महिने कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने बाजारपेठ बंद होती. मात्र त्यानंतर आता पावसामुळे सुमारे 15  दिवस बाजारपेठ बंद राहिल्याने राजापूर शहरातील व्यापारी मेटाकुटीला आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या