राजर्षी शाहू समाधी स्मारकाभोवती विद्रुपीकरणाचा विळखा, कोल्हापुरातील हेरिटेज वास्तूंच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीतल धनवडे

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बाग परिसरात साकारण्यात आलेल्या भव्य अशा समाधी स्मारकाभोवती गेल्या काही दिवसांपासून विद्रूपीकरणाचा विळखा पडला आहे. एकीकडे पर्यटकांचा ओघ वाढत असताना, कोल्हापुरातील अनेक हेरिटेज वास्तूंची दुर्दशा झाल्याची परिस्थिती आहे. वेळीच आवश्यक उपाययोजना न केल्यास त्यामध्ये या समाधी स्मारकाची भर पडेल काय? अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी अधूनमधून हेरिटेज मोहिमेचा दिखावा करणाऱयांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेक प्रेरणादायी प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंमुळे आध्यात्मिक व ऐतिहासिक परंपरा असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. मात्र, दुर्दैवाने यातील अनेक हेरिटेज वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात कोल्हापूरकरांना अपयश आल्याचे वास्तव चित्र दिसते. पर्यटनवाढीच्या नावाखाली आजही केवळ हेरिटेजचे इव्हेंट करण्यात प्रशासन मश्गुल असल्याचेही पाहावयास मिळते.

सध्या नर्सरी बाग परिसरात साकारलेल्या भव्य अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक परिसराभोवती होत असलेले विद्रूपीकरण चिंतेचा विषय बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर गादीच्या संस्थापिका रणरागिणी छत्रपती ताराराणी यांचेही मंदिर असलेला नर्सरी बाग परिसर यापूर्वीही अनेकदा अस्वच्छता आणि दुर्लक्षामुळे चर्चेत राहिले होता. मात्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार शिव-शाहूप्रेमींच्या मागणीनंतर गेल्या एक-दोन वर्षांत याच परिसरात त्यांचे समाधी स्मारक साकारण्यात आले. सभोवताली संरक्षक भिंत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या स्नुषा छत्रपती ताराराणी यांच्या मंदिरांसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक संरक्षित राहिले. आज हे समाधी स्मारक तमाम शिव-शाहूप्रेमींना ऊर्जा देणारे पवित्र स्थान बनले आहे. तर, पर्यटकांचाही लोंढा वाढत असताना, दुर्दैवाने या स्मारकाभोवती विद्रूपीकरणाचा वेढा पडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरालगत संरक्षक भिंतीवर फाटकी वस्त्र कित्येक दिवस टांगून ठेवली आहेत. संरक्षित भिंतीसमोर अवजड व हलकी वाहने उभी करण्यात येत असल्याने स्मारक झाकोळले जात असल्याचेही काही वेळा पाहावयास मिळत आहे. संबंधित प्रशासनाने त्वरित हा समाधी स्मारक परिसर कायमचा विद्रूपीकरणमुक्त करावा, अशी मागणी शिव-शाहूप्रेमींतून होत आहे.