राजकीय भूकंप, बसपाच्या सर्व आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; मायावतींचा आकांडतांडव

2656

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बहुजन समाज पक्षाचे सर्वच्या सर्व सहा आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजेंद्र गुढा (उदयपुरवाटी), जोगेंद्र सिंह अवाना (नदबई), वाजिब अली (नगर), लाखन सिंह मीणा (करौली), संदीप यादव (तिजारा) आणि दीपचंद खेरिया अशी आमदारांची नावे आहेत. आपल्या आमदारांचा पक्षबदल पाहून मायावती यांनी आकांडतांडव केला असून काँग्रेसवर टीका केली आहे. समर्थन देणाऱ्या पक्षांचेच काँग्रेस नेहमी लचके तोडते, अशा शब्दात मायावती यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.

मायावती यांनी एकामागोमाग एक ट्वीट करत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस दलित विरोधी आणि फसवणूक करणारा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. मायावती यांच्या या टिकेला मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्याच्या हितासाठी सर्व आमदारांनी स्वेच्छेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे गहलोत म्हणाले.

मायावतींची जहरी टीका
मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले की, ‘राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाच्या सरकारने पुन्हा एकदा बसपाच्या आमदारांना फोडून अविश्वासू आणि फसवणूक करणारा पक्ष आहे याचा प्रत्यय दिला आहे. बसपासोबत हा विश्वासघात आहे. बसपाने सरकारला विनाशर्त पाठिंबा दिलेला असतानाही काँग्रेसने विश्वासघात केला.’

mayavati

मायावती दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘काँग्रेस आपल्या विरोधी पक्षांचा लढण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी त्यांना समर्थन आणि पाठिंबा देणाऱ्या पक्षांवरच आघात करत आहे. काँग्रेस एससी, एसटी, ओबीसीविरोधी पक्ष असून या लोकांच्या हक्कांप्रती काँग्रेस पक्ष गंभीर नाही.’

आणखी एका ट्वीटमध्ये मायावती म्हणतात, ‘काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारधारांना विरोध केला आहे. याचमुळे डॉ. आंबेडकर यांना कायदेमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेसने कधीच त्यांना लोकसभेवर जावू दिले नाही आणि त्यांना भारतरत्नही दिले नाही. हे अतिशय दु:खदायक आणि लाजिरवाणे आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या