
प्रियकराच्या लग्नावरून झालेल्या वादातून वकील प्रेयसीवर गोळी झाडत प्रियकराने स्वतःचे जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी प्रियकावर याआधीही तीन-चार गुन्हे दाखल आहेत. करण गुर्जर असे आरोपी प्रियकराचे तर पूर्वा शर्मा असे पीडित प्रेयसीचे नाव आहे.
राजस्थानच्या कोटामधील आरके पुरम परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, करण आणि पूर्वाचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र तीन महिन्यांपूर्वी करणने दुसऱ्या तरूणीशी विवाह केला होता. यावरूनच करण आणि पूर्वामध्ये भेटीदरम्यान फॉरेस्ट ऑफिसजवळ भांडण झाले. यानंतर करण थेट पिस्तुल काढली आणि पूर्वावर गोळी झाडली. यानंतर पूर्वा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली.
गोळीबारात पूर्वाचा मृत्यू झाल्याचे समजून करणने स्वतःवर गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी पूर्वावर कोटा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुल ताब्यात घेतली आहे. पूर्वाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. ही पिस्तुल करणकडे कशी आली याबाबतही पोलीस तपास करत आहेत.