अपघातात एकाच कुटुंबातील 8 जण जागीच ठार, मृत्यूपूर्वी जल्लोषात साजरा केला होता वाढदिवस

मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यात डोळ्याच्या कडा पाणावणारी घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील 8 जणांच्या तिरड्या एकाचवेळी उठल्या आणि संपूर्ण गाव हळहळले. मृत्यूपूर्वी काही तास आधीच सर्वांनी दणक्यात वाढदिवस साजरा केला होता.

वृत्तानुसार, राजगड जिल्ह्यातील जिरापूर येथील रहिवासी ललित पिता श्याम सोनी आणि पवन पिता सुंदरलाल सोनी हे दोघे बंधू 1 जानेवारीला खाटू श्याम येथे दर्शनासाठी पायी निघाले होते. दोघे जवळपास 25 दिवसानंतर राजस्थानमधील खाटू श्याम मंदिरात पोहोचले. यानंतर दोन्ही भावांना आणण्यासाठी कुटुंबिय दोन गाड्या करून राजस्थानमध्ये पोहोचले होते.

खाटू श्याम येथे दर्शन घेतल्यानंतर आणि पुजा-अर्चा संपन्न झाल्यानंतर सोनी कुटुंबिय 26 जानेवारीला दोन गाड्यातून घराकडे निघाले. मात्र टोंक जिल्ह्यातील एनएच 52 वर मंगळवारी रात्री एका वेगवान ट्रेलरने सोनी कुटुंबियांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पार चक्काचूर झाला. अपघातामध्ये 8 जणांना प्राण गमवावे लागले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 2 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 पुरुष, 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. तर चार जण गंभीर जखमीही झाले असून त्यांना तात्काळ जयपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये गाडीचा चालक आणि एक छोटी मुलगी वाचली असून त्यांना जास्त गंभीर जखमा झालेल्या नाहीत. मात्र अपघातानंतर दोन्ही गाड्यांचे चालक फरार झाले आहेत.

गाडीचा चेंदामेंदा

दरम्यान, रात्रीच्या सुमारास महामार्गावरून धावणाऱ्या दोन्ही गाड्यांचा वेग तुफान होता. अपघातानंतर गाडीचा पार चेंदामेंदा झाला. दोन्ही गाड्या पत्रा फाडून आरपार घुसल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने गाड्या वेगळ्या केल्या आणि मृतदेह बाहेर काढले.

एकाचवेळी उठल्या तिरड्या

अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या रामबाबू सोनी, श्याम सोनी, लिलत सोनी, नयन सोनी, बबली सोनी, अक्षिता सोनी यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावाच्या डोळे पाणावले होते. तर ममता सोनी आणि अक्षत सोनी या माता-पुत्रावर मक्सीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या