
राजस्थानमधील जयपूर येथे एक संतापजनक प्रकार घडला आहे. येथील वर्ल्ड ट्रेंड पार्क मॉलमध्ये एका महिलेला चोरीच्या आरोपाखाली कपडे उतरवून तपासणी केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. आता या महिलेने शोरूमच्या मालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.45 वाजता या मॉलमधील एका शोरूममध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी महिला काही ड्रेस ट्राय करण्यासाठी शोरूमच्या चेंजिंग रूममध्ये गेली होती. मात्र महिलेला कपडे फिट न बसल्याने तिने शोरूमच्या कर्मचाऱ्याला आपल्या साईझचे कपडे आणण्यास सांगितले. चेंजिग रूममधून आपल्याला आवडलेले कपडे घेऊन महिला बाहेर आली आणि बिलिंगसाठी कॅश काउंटरवर गेली. त्याचवेळी शोरूममधील कर्मचाऱ्याला महिलेला ट्राय करण्यासाठी दिलेल्या कपड्यामध्ये एक पीस कमी असल्याचे दिसले.
यानंतर या कर्मचाऱ्याने महिलेला कॅश काउंटरकडे अडवले, इतर कर्मचारी व शोरूमच्या मॅनेजरला बोलावून घेतले आणि महिलेवर कपडे चोरी केल्याचा आरोप केला. या कर्मचाऱ्याच्या आरोपानंतर महिलेने आपण चोरी केली नसल्याचे सांगत, हवं तर आपल्याकडील बॅग व पिशवीची तपासणी करावी, असे सांगितले. महिलेकडील बॅग आणि पिशवीची तपासणी केली असता त्यात चोरीचे कपडे सापडले नाही. त्यानंतर शोरूमच्या मॅनेजनरने महिलेचे काहीही ऐकून न घेता शोरूमधील एका महिला कर्मचारीला पीडिताचे कपडे उतरवून तपासणी घेण्यास सांगितले. या महिला कर्मचारीने चेंजिग रूममध्ये पीडिताचे कपडे उतरवून तपासणी केली असता या पीडित महिलेने कपडे चोरी केले नसल्याचे उघडकीस आले.
यादरम्यान पीडित महिला आपल्या अपमानासाठी रडत राहिली, मात्र तिचे कोणीही ऐकले नाही. या घटनेनंतर पीडित महिलेने अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनेनुसार शोरूम मालक आणि कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.




























































