नगर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या 10 ते 11 आरोपींकडून जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाद मागण्यात आली आहे. बुधवारी (दि. 16) न्यायाधीश मेहेर यांच्यासमोर सुनावणी सुरू झाल्यावर सरकारी वकिलांनी तपासी अधिकाऱयांकडून कोणतीही सूचना आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून, आता 24 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. अतिशय महत्त्वाच्या प्रकरणात सरकारी वकील तपासी अधिकाऱयांकडून सूचना नसल्याचे सांगतात, ही बाब धक्कादायक असून, पोलिसांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तपासी अधिकाऱयांनी आरोपींच्या जामिनाला विरोध करणे अपेक्षित असताना ते वकिलांना सूचनाच देत नसतील तर गोरगरीब ठेवीदारांना न्याय मिळेल की नाही, असा सवाल बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांनी उपस्थित केला आहे.
राजेंद्र चोपडा यांनी सांगितले की, आरोपींकडून उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न होत असून, तो त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र, अशा लोकांच्या जामिनाला विरोध करणारा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे होणे अपेक्षित आहे. या संदर्भात तीनच दिवसांपूर्वी बँक बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेतली होती. आर्थिक गुन्हे शाखेला कोर्टात व्यवस्थित बाजू मांडण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु, सुनावणीवेळी सरकारी वकील तपासी अधिकाऱयांकडून कोणत्याच सूचना नसल्याचे सांगतात. वास्तविक या गंभीर प्रकरणात इतकी बेपर्वाई दाखवणे चुकीचे आहे. युक्तिवादानंतर कोर्टाने मेरिटवर योग्य निकाल दिला असता. तो कोणाच्याही बाजूने आला असता तरी त्यात हरकत घेण्यासारखे काही नाही; पण सुनावणीवेळी सरकारी पक्षाने अशाप्रकारे भूमिका घेणे अयोग्य आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या या आर्थिक घोटाळ्यात पोलीस प्रशासन असा हलगर्जीपणा करीत आहे, असे ते म्हणाले.
एकीकडे बँकेत ठेवी अडकलेले हजारो ठेवीदार हक्काचे पैसे मिळत नसल्याने हवालदील झाले आहेत. बँकेवर नियुक्त केलेले अवसायक गणेश गायकवाड प्रामाणिकपणे थकीत कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातून ठेवीदारांना काही रक्कम परतही मिळत आहे. परंतु, या प्रकरणातील आरोपींवरील कारवाईस पोलिसांकडून होणारी दिरंगाई न्याय नाकारणारी आहे. पोलिसांना याच पद्धतीने काम करायचे असल्यास भ्रष्टाचाऱयांना रान मोकळे झाल्यासारखे होईल. कायद्याच्या राज्यात पोलीस इतकी ढिलाई दाखवत असतील तर सर्वसामान्यांना कधीच न्याय मिळणार नाही, असे राजेंद्र चोपडा यांनी म्हटले आहे.
नगर अर्बनच्या आणखी तीन शाखा बंद होणार
n अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी तीन शाखा 8 नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार आहेत. दैनंदिन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली. बंद होणाऱया शाखांमध्ये बालमटाकळी, वांबोरी व कोल्हार-भगवतीपूर या तीन शाखांचा समावेश असून, बालमटाकळी शाखेचे काम शेवगाव शाखेतून, वांबोरी शाखेचे काम नगर मुख्य शाखेतून, तर कोल्हार शाखेचे कामकाज बेलापूर शाखेतून होणार आहे. यापूर्वी भाडेतत्त्वावर कार्यालय असलेल्या बँकेच्या 13 शाखा बंद केल्या आहेत.