…तर तीन दिवसांत महाराष्ट्रात लसीकरण बंद होईल! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा केंद्र सरकारला इशारा

एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असतानाच राज्यात 3 लाख लोकांचे दररोज लसीकरण केले जात आहे. दररोज सहा लाखांचे लक्ष्य असताना आज साडेचार लाख लोकांना लसीकरण करण्यापर्यंत पोहोचलो आहेत. पण राज्यात लसींचा तुटवडा भासत आहे. सद्यस्थितीत राज्यात फक्त 14 लाख कोरोनाविरोधी लसींचे डोस शिल्लक आहेत. हा साठा फक्त पुढील तीन दिवस पुरेल इतकाच आहे. तीन दिवसांत साठा आला नाही तर लसीकरण बंद पडेल. त्यामुळे लसीचा पुरवठा करा, अशी मागणी वारंवार केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यातील लसीकरणाची स्थिती तसेच रेमडेसीवीरच्या पुरवठय़ाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, आम्ही लसीकरणासाठी गावा गावात टीम पाठवत आहोत. तशी यंत्रणा आम्ही उभी केली आहे. पण आम्हाला लस मिळत नाही. काल मी कळकळीची विनंती केली आम्हाला लस लवकर द्या. सर्वात जास्त फिरणारा वर्ग 20 ते 40 या  वयोगटातील आहे. त्यामुळे हे लोक जास्त कोरोनाग्रस्त झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे 18 वर्षांच्या पुढे सर्वांचे लसीकरण करायची मागणी केली आहे.

केंद्राकडे पाठपुरावा करू – फडणवीस

मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा नियमितपणे होत असतो. देशात सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. लस पुरवठय़ाबाबत करण्यात येणारा आरोप चुकीचा आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारने मीडियात बोलण्याऐवजी केंद्र सरकारशी चर्चा करून लस पुरवठय़ासाठी पाठपुरवा करणे  आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

दर आठवडय़ाला 40 लाख लसींची गरज

लस उपलब्ध नसल्याने लोक परत जात आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे, केंद्राकडून न मिळणारे लसींचे डोस. राज्याला दर आठवडय़ाला 40 लाख लसींची गरज आहे. लोकांना लसीकरण केंद्रातून परतावे लागणे ही राज्यासाठी फार लाजीरवाणी गोष्ट आहे. राज्यातील काही जिह्यांत लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्राला प्रथम पुरवठा करा

कोविड-19 च्या दुसऱया लाटेत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झालाय. राज्यात सद्यस्थितीत 4 लाख 70 हजारांपेक्षा जास्त ऑक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पण लस नाही म्हणून आम्हाला काही लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. अनेक केंद्रांवरून लस नाही म्हणून लोकांना आम्ही परत पाठवत आहोत. इतर राज्यात नंतर करा, पण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढतायत. त्यामुळे इथे आधी द्या, अशी मागणी केल्याचे टोपे म्हणाले.

  • महाराष्ट्रात दर दिवसाला 50 हजार रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्याने या सर्वांचा वापर होत आहे. त्यामुळे रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी केंद्राने मदत करावी.

मागेल त्याला लस द्या! काँग्रेसची मागणी

महाराष्ट्रासारख्या कोरोनाबाधित राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेसचे  नेते व खासदार राहुल गांधी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला लस घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यांची ही मागणी योग्य असल्याचे सांगत चव्हाण यांनी महाराष्ट्रासारख्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या काही राज्यांमध्ये तरी नियमात शिथिलता आणून लसीकरणाचे प्रमाण वाढवले पाहिजे, असे ते म्हणाले.  कोरोनाच्या नव्या लाटेत तरुणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आता केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा 45 वर्षांवरील नागरिक अशी मर्यादा न ठेवता 18 वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी मागेल त्याला लस देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

लसींचा तुटवडा,केंद्राची उलटी बोंब; कोरोना लढय़ाला महाराष्ट्रामुळे खीळ

देशातील कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवडय़ावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी महाराष्ट्रावरच खापर फोडले. महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे कोरोनाविरोधातील देशाच्या प्रयत्नांना खीळ बसल्याची टीका त्यांनी केली.

लसीच्या तुटवडय़ाबाबत महाराष्ट्र सरकारचा आरोप खोटा आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून मी मागील वर्षभरापासून बघतोय, कोरोना लढय़ातील  प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र सरकारची चालढकल सुरू आहे. महाराष्ट्र व छत्तीसगड ही राज्ये आपले अपयश झाकण्यासाठी जनतेमध्ये दहशत पसरवत असल्याचे हर्षवर्धन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या