राजिवडा येथे जमावबंदी आदेशाचा भंग करण्याऱ्या 200 जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केलेला असताना जिल्हाधिकारी यांचे आदेश धुडकाऊन कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राजिवडा येथील 200 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी, दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

राजिवडा येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्याने शुक्रवार सायंकाळपासून हा परिसर सील करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी या परिसरातील एक गर्भवती महिला दुचाकीवरून रूग्णालयात जाण्यासाठी निघाली होती. यावेळी पोलिसांनी या दुचाकीला अडवून रूग्णालयाची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. गरोदर महिलेला पोलिसांकडून अडवण्यात आल्याचे वृत्त परिसरात पसरताच राजिवडामधील शेकडो महिला आणि पुरूष जमावबंदी धुडकावीत रस्त्यावर आले आणि त्यांनी पोलिसांशी जोरदार वादावादी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जियाउद्दीन फणसोपकर, फैजान फणसोपकर, सलमान पकाली, राहील फणसोपकर, मुज्जफर मुजावर, अरमान मुजावर, शमशुद वस्ता, नबील, अकिल, गुड्डू कोतवडेकर, जूबेद वस्ता, रिज्जू पकाली, हसनमियाँ, चर्सी बादशाह, खालिद, आपान मलबारीचा मुलगा, रियाज फणसोपकर या अठरा जणांसह राजिवड्यातील आणखी 182 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संशयितांनी राजिवडा येथे बेकायदेशीर जमाव केला. शिवाय राजिवडा, खडपेवठार बाजुकडील सार्वजनिक रस्त्यावर शासकीय कर्तव्य बजावीत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा हातातील मोबाईल व लाठी हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस कर्मचारी यांच्या डोक्यात मारून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या