कुठलीही आगळीक केल्यास पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलू, सर क्रीकवरून राजनाथ सिंहांचा गर्भीत इशारा

देशात दसऱ्याचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरू आहेत. सर क्रीक भागाला लागून असलेल्या परिसरात पाकिस्तानने सैन्याच्या वास्तूंवर भर दिला आहे. यावरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला गर्भीत इशारा दिला आहे. सर क्रीक भागात पाकिस्तानने कुठल्याही प्रकारची आगळीक केली तर असे निर्णायक उत्तर मिळेल की इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलतील, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे. राजनाथ सिंह आज गुजरात दौऱ्यावर आहेत. भूजमध्ये विजयादशमी साजरी करत शस्त्र पूजन केले. त्यानंतर कच्चमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला.

पाकिस्तानच्या हेतूंबद्दल शंका येणे स्वाभाविक आहे, कारण त्याच्या अलीकडील कृतींवरून सर क्रीक भागात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. हिंदुस्थानचे लष्कर आणि बीएसएफ संयुक्तपणे आणि सतर्कतेने देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत. पाकिस्तानने सर क्रीक परिसरात कुठलीही आगळीक केली तर त्याला असे निर्णायक उत्तर मिळेल की, त्यामुळे इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून जाईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला १९६५ च्या युद्धाची आठवण करून दिली. हिंदुस्थानच्या लष्कराने लाहोरपर्यंत पोहोचण्याची क्षमता दाखवून दिली होती. आज २०२५ मध्ये पाकिस्तानने हे विसरू नये की, कराचीला जाणारा एक मार्ग या खाडीतून जातो, असे राजनाथ सिंह यांनी ठणकावले. सर क्रीकचा भाग हा सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. तेथील कोणत्याही लष्करी तणावाचा परिणाम केवळ हिंदुस्थान-पाकिस्तान संबंधांवरच होणार नाही तर हिंदी महासागरमधील अस्थिरता वाढवू शकतो.