
हिंदुस्थानने नेहमीच जबाबदार देश म्हणून संयमाने भूमिका निभावली आहे, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, आमच्या सहनशीलतेचा कुणी गौरफायदा उचलेल. जर कुणी असे केले तर त्यांना कालप्रमाणेच क्वालिटी कारवाईने उत्तर देऊ, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी आज नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्हमध्ये संवाद साधला.
‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल आणि हिंदुस्थानी लष्कराने दाखवलेल्या धैर्य आणि शौर्याबद्दल मी आपल्या सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो, असे राजनाथ सिंह म्हणाले. आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेत दहशतवादी तळांना ज्याप्रकारे उद्ध्वस्त केले ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. 2014 मध्ये सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आम्हाला एक अतिशय महत्त्वाचा कानमंत्र दिला. सुरुवातीला त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला. त्यामागे संरक्षण सार्वभौमत्व हे तत्त्वज्ञान होते, असे ते म्हणाले.
ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कॉर्पोरेटायझेशन
सरकारने संरक्षण उत्पादन गुणवत्तेवर भर दिला असून उत्पादनात अल्पावधीत व्यापक सुधारणा घडवून आणण्यासाठी ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कॉर्पोरेटायझेशन केल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कॉर्पोरेटीकरण केल्यापासून आजपर्यंत संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये सातत्याने सुधारणा झाली आहे आणि कॉर्पोरेटायझेशननंतर दर्जेदार उत्पादने वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.