राम मंदिर परिसरात गोळी लागून सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू, चुकून गोळी सुटल्याचा दावा

राम मंदिर परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाचा डोक्यात गोळी लागून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. शत्रुघ्न विश्वकर्मा असे या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्याच्याकडून चुकून गोळी सुटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली असून सुरक्षा रक्षकांनाच शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण योग्य प्रकारे दिले नव्हते का? हा अपघात होता की घातपात की आत्महत्या, शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण नसलेले सुरक्षा रक्षक राम मंदिराचे संरक्षण कसे करणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

पहाटे 5 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास 25 वर्षीय विश्वकर्मा यांना गोळी लागल्याची घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्व सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांना तत्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी विश्वकर्मा यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे अयोध्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विश्वकर्मा यांचा मृतदेश शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच विश्वकर्मा यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

तीन महिन्यांपूर्वीही घडली होती अशीच घटना

तीन महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानाला गोळी लागली होती. बंदूक साफ करताना जवानाकडून अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळी झाडली गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही गोळी जवानाच्या छातीतून आरपार गेली होती. दरम्यान, राम मंदिराच्या सुरक्षेसाठी योगी सरकारने चार वर्षांपूर्वी ‘एसएसएफ’ म्हणजेच विशेष सुरक्षा दलाची स्थापना केली होती. ‘एसएसएफ’ला कुणालाही वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. एडीजी स्तरावरील अधिकारी या ‘एसएसएफ’चे नेतृत्व करतात.