पराभवाच्या भीतीने पवार मशीनबद्दल बोलत आहेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ramdas-atahwale

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

यावेळी बारामतीत मोठे बदल घडवण्याचा विचार लोकांच्या मनात दिसत असून ही जागा आता आपल्या हातून जाणार ही भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सतावत आहे. या भीतीपायीच पवार ईव्हीएम मशीनबद्दल बोलू लागलेत असा टोला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.

दुष्काळी पाहणी दौऱयावर असलेल्या आठवले यांनी सोमवारी रात्री उशिरा सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील चारा छावणीला भेट देऊन तेथील शेतकऱयांशी चर्चा केली. दरम्यान, मागील निवडणुकीत महादेव जानकर थोडय़ाथोडक्या मतांनी हरले होते. पण त्यावेळी त्यांनी कपबशीऐवजी कमळ हे चिन्ह घेतले असते तर 15 ते 20 हजार मतांनी निवडून आले असते, असेही आठवले म्हणाले. एखाद्या मशीनमध्ये घडय़ाळाला दिलेले मत कमळाला जात असेल पण दुसऱया मशीनमध्ये कमळाला दिलेले मत घडय़ाळाला जात असेल अशा शब्दांत आठवले यांनी पवारांना टोला लगावला.