
राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असणाऱ्या सावली बारमध्ये 22 बारबालांना गिऱ्हाईकांसह पकडण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला होता. त्यावरून खळबळ माजली असतानाच योगेश कदम यांचे पिता व मिंधे गटाचे रामदास कदम यांनी तो बार आपल्या पत्नीच्याच नावे असल्याची जाहीर कबुली दिली.
सावली बार माझी पत्नी ज्योती कदम हिच्या नावे आहे. पण सध्या तो शेट्टी नावाच्या इसमाला चालवायला दिला आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले. त्या बारला ऑर्पेस्ट्राचे, मुलींचे, वेटरचे लायसन्स आहे, असे कदम यांनी सांगितले. एका गिऱहाईकाने एका मुलीवर पैसे उधळल्याचाही प्रकार घडला होता, असेही ते म्हणाले. बार एखाद्याला चालवण्यासाठी दिला असेल तर तिथे घडणाऱया घटनांसाठी तोच जबाबदार आहे, असे सांगत कदम यांनी या प्रकरणातून हात झटकले.