
>> रामदास कामत
बांदीपोरा जिह्यातील दुर्गम भागांपैकी एक असलेल्या गुरेझ सेक्टरमधील बख्तोर परिसरात घुसखोरी करणाऱ्या आठ सशस्त्र दहशतवाद्यांचा सामना करताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरगती प्राप्त झाली. एक समर्पित सैनिक आणि दृढनिश्चयी अधिकारी आपलं कर्तव्य बजावत असताना वयाच्या 29 व्या वर्षी हुतात्मा झाले. सैन्यात भरती होण्याचे लहानपणी पाहिलेले स्वप्न त्यांची जिद्द आणि शौर्य सार्थ करणारे ठरले.
एक पाच-सहा वर्षांचा मुलगा. आईसोबत कुलाब्याला देशोदेशींच्या नौदलाची परेड पाहयला जातो. गणवेशाचा रुबाब, शिस्तबद्धता पाहून प्रभावित होतो. पुढे सातवीनंतर मेच्या सुट्टीत रायगड मिलिट्री ट्रेनिंग स्कूल येथे महिनाभर प्रशिक्षणासाठी जातो. आठवीत शाळेतील स्पर्धेत मित्रांसह स्वरचित लघुनाटिका सादर करून पारितोषिक मिळवतो. विषय असतो वीरगती प्राप्त झालेल्या जवानाचा. त्या जवानाचे वृद्ध पिता म्हणतात, ‘मला अजून एक पुत्र असता तर तोसुद्धा देशाला अर्पण केला असता.’ आणि नंतर सोळा वर्षांनी हाच प्रसंग त्याच्या बाबतीत सत्यात उतरतो.
ही कहाणी आहे हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे, बार टु सेना मेडल यांची. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1989 रोजी झाला. मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिह्यातील वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे. ते मीरा रोड येथील शीतलनगर भागात लहानाचे मोठे झाले. होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शालेय आणि नंतर एल.पी. रावल कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील शैलेंद्र कॉलेजमधून पदवीधर झाले. वर उल्लेख केलेल्या प्रसंगांनी सैन्यात भरती होण्याची बिजे रुजलीच होती. म्हणून सैन्यात जायचे या निश्चयाने पुण्यातील कर्नल प्रमोदन मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकी प्रशिक्षण परीक्षेची, मुलाखतीची तयारी त्यांनी केली आणि त्यांचे लाडके शिष्य बनले.
त्यांनी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा उत्तीर्ण करून ऑक्टोबर 2010 ते सप्टेंबर 2011 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए) येथे त्यांचे सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर गढवाल रायफल्स रेजिमेंटच्या 12 गढ रिफमध्ये नियुक्त झाले. त्यांची पहिलीच नियुक्ती कुपवाडासारख्या संवेदनशील आणि जोखमीच्या भागात झाली. तेथे त्यांनी विविध ऑपरेशन्समध्ये आपले शौर्य दाखवले. पुढे जम्मू आणि कश्मीरमध्ये अतिरेकीविरोधी कारवायांमध्ये ते पारंगत झाले. लष्करी सेवेचा एक अविभाज्य भाग म्हणून 36 आरआर (12 गढ रीफ) मध्ये त्यांची नियुक्ती झाली.
2017 मध्ये श्रीनगरपासून सुमारे 125 किमी अंतरावर असलेल्या बांदीपोरा जिह्यातील दुर्गम भागांपैकी एक असलेल्या गुरेझ सेक्टरमध्ये त्यांची बटालियन तैनात होती. जुलै 2017 मध्ये त्यांनी एक अतिरेकी विरोधी कारवाई यशवीरीत्या पार पाडली आणि चार अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. या पराक्रमाबद्दल 26 जानेवारी 2018 रोजी त्यांना सेना मेडल जाहीर झाले. 6 ऑगस्ट 2018 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास सुमारे आठ सशस्त्र दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत बख्तोर परिसरातील गोविंद नाल्याजवळ भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सतर्क सैनिकांनी पाकव्याप्त कश्मीरमधून येणाऱया घुसखोरांना आव्हान दिले. मेजर कौस्तुभ राणे आणि त्यांच्या साथीदारांनी कारवाई केली आणि घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया दहशतवाद्यांना ठार मारले. दुर्दैवाने, जोरदार गोळीबारात मेजर कौस्तुभ राणे आणि इतर तीन सैनिक रायफलमन मनदीप सिंग रावत, रायफलमन हमीर सिंग आणि गनर विक्रमजीत सिंग यांना वीरमरण आले. एक समर्पित सैनिक आणि दृढनिश्चयी अधिकारी आपलं कर्तव्य बजावत असताना वयाच्या 29 व्या वर्षी हुतात्मा झाले. या पराक्रमाबद्दल 15 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना दुसरे सेना मेडल जाहीर झाले. दुर्दैवाने ही दोनही मेडल्स त्यांना प्रत्यक्ष स्वीकारता आली नाहीत. महाराष्ट्र सरकारकडूनही त्यांना ‘गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
ज्या गुरेझ भागात दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ हुतात्मा झाले, तेथील सौर ऊर्जा प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट कौस्तुभ’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कौस्तुभ यांचे माता-पिता ज्योती आणि प्रकाश राणे यांच्या हस्ते झाले. याशिवाय हजरत निजामुद्दीन स्थानकाजवळ असलेल्या टीकेडी डब्लूडीपी-48 ह्या लोकोमोटीव्हलाही मेजर कौस्तुभ यांचे नाव देण्यात आले आहे. मीरा रोड येथे त्यांचे वीर स्मृती स्मारक, त्यांच्या स्मरणार्थ अमरज्योत सोबतच एका जॉगर्स पार्कलाही त्यांचे नाव दिले गेले आहे. वैभववाडीतील एका महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियमला तर वाडय़ाजवळील कोदाड गावातील एका अंगणवाडीला मेजर राणे यांचे नाव देण्यात आले आहे.
आपल्या पतीचा वारसा पुढे नेत कनिका राणे भारतीय सैन्यात सामील झाल्या आणि आज उच्च पदावर कार्यरत आहेत. याशिवाय राणे यांच्या पश्चात मुलगा अगस्त्य, बहीण काश्यपी, उत्कर्ष मंदिर या शाळेतून निवृत्त झालेल्या मातोश्री ज्योती आणि विदेश संचार निगममधून निवृत्त झालेले वडील प्रकाशकुमार असा परिवार आहे. माता-पित्यानी प्लॅस्टिक निर्मूलन, वृक्ष संवर्धन अशा सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांच्या घरून निघताना चार ओळींकडे माझे लक्ष गेले. एका वीरमातेने आपल्या लाडक्या सुपुत्रासाठी लिहिलेल्या खालील चार ओळी हृदय हेलावून टाकणाऱ्या होत्या.
“अंश तू माझा, वंश तू माझा, कुशीत माझ्या जन्म घेतला,
भाग्य माझे थोर म्हणूनी, तुझ्यासारखा पुत्र लाभला…!’’