रामेश्वर-नारायण पालखी सोहळ्यात भाविकांचा जनसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

भाव भक्तीचा अनोखा संगम साधत मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर – नारायण पंचायतांचा ऐतिहासिक पालखी सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. या महामेळ्यात मालवण शहरात भाविकांचा जणू सागर लोटला होता. विविध वैशिष्टयानी रंगलेल्या या पालखी सोहळ्यात आपल्या ग्रामदैवतांच्या भेटीने भाविक तृप्त झाले.

मालवणची ग्रामदैवत श्री रामेश्वर व नारायण यांचा ऐतिहासिक शिवकालीन पालखी सोहळा दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी साजरा होतो. मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर- नारायण काल गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पालखीत बसून मालवणच्या परिक्रमणेसाठी बाहेर पडली. तत्पूर्वी या दोन्ही ग्रामदैवतांना मानकऱ्यांनी विधिवत पूजाअर्चा करून श्रीफळ ठेवीत गाव परिक्रमणेसाठी बाहेर पडत असल्याचे गाऱ्हाणे घातले. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या तुफानी आतषबाजीत श्री देव रामेश्वर नारायण मानकरी व आपल्या रयतेसह पालखीत बसून परिक्रमणेसाठी प्रस्थानकर्ते झाले. या पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण मालवण नगरी सजली होती.

श्री देव रामेश्वर- नारायणाने परिक्रमणेसाठी देऊळवाडा येथून आपली राऊळे सोडली आणि आडवण मार्गे वायरी तानाजी नाका येथे दुपारी पावणे तीन वाजता पालखीचे आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मार्गावर रांगोळ्या, पताका व स्वागत कमानी उभारल्या होत्या. पालखी तानाजी नाक्यावर येताच पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच वायरी ग्रामस्थांतर्फे मोफत थंडपेयाची सोय करण्यात आली होती. वायरी तानाजी नाका येथून भक्तांना दर्शन देत देत श्री देव रामेश्वर- नारायण वायरी भूतनाथ येथील श्री भूतनाथच्या भेटीला गेले. त्याठिकाणी रितिरिवाजानुसार मंदिरात श्रीफळ ठेवून भेटवस्तू देण्यात आल्या. त्यांनतर सायंकाळी हि पालखी मिरवणूक वायरी समुद्रकिनारीमार्गे ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गचे भूमिपूजन केले त्या मोरेश्वर म्हणजेच मोरयाचा धोंडा येथे पोहोचली. याठिकाणी मच्छिमार व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोरेश्वराच्या भेटीनंतर पालखी दांडी येथील श्री दांडेश्वरच्या भेटीला थांबली. पालखीच्या स्वागतासाठी वायरी- दांडी येथील मच्छीमारांनी जय्यत तयारी करून फुलमाला व पताक्यांनी आपल्या नौका सजविल्या होत्या. मछिमारांसोबतच नागरिकांनी पालखी समोर नतमस्तक होत दर्शन घेत साकडे घातले. मत्स्यव्यवसायाला बरकत यावी व मच्छीमारांवर आलेली संकटे दूर व्हावीत यासाठी मच्छिमार बांधवांनी रामेश्वर- नारायणाला गाऱ्हाणे घातले. किनाऱ्यावरील गवंडीवाडा- मक्रेबाग येथील मक्रेश्वर देवालयातर्फे पालखीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. मक्रेबाग किनाऱ्यावर गेली ६७ वर्षांपासून पालखीच्या स्वागतासाठी वाळूचे मंदिर साकारण्यात येत असून यंदाही आकर्षक मंदिर साकारून पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच किनाऱ्यावर भाविकांसाठी ठिकठिकाणी सरबताची व्यवस्था तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

मालवण किनाऱ्यावरून सायंकाळी हि पालखी बंदर जेटी मार्गे मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिरात आली. येथे देव रामेश्वराने आपली बहीण काळबादेवीची भेट घेतली. यावेळी याठिकाणीही रितिरिवाजानुसार श्रीफळ ठेवून भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर पालखी मेढा येथील जोशी मांड येथे दर्शनासाठी थांबली. येथेही फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. पुन्हा बंदर जेटी मार्गेही पालखी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाजतगाजत मालवण बाजारपेठेत दाखल झाली. यावेळी व्यापारी संघ व नागरिकांच्यावतीने फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बाजारपेठेत दाखल झाल्यावर पालखी सोमवार पेठेतील रामेश्वर मांड येथे दर्शनासाठी थांबली. यावेळी आपल्या ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. भाविकांनी दर्शन घेतल्यावर रात्री साडेदहा वाजता पालखी बाजारपेठ- भरड- एसटी स्टॅन्ड मार्गे देऊळवाड्याच्या दिशेने आपल्या परतीच्या प्रवासास निघाली. वाटेतील भाविकांना दर्शन देत पालखीतील रामेश्वर नारायण रात्री उशिरा पुन्हा देऊळवाडा येथील आपल्या राऊळात विराजमान झाले.

बाजारपेठ गजबजली
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मालवणनगरी व बाजारपेठ सजली होती. प्रत्येक घर व दुकानांमध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने मालवण उजळून निघाले होते. खाद्य पदार्थ व कोल्ड्रिंक्सची दुकाने- स्टॉल, हॉटेल्स गजबजून गेली होती. तर खेळण्यांच्या दुकानात बच्चेकंपनीने गर्दी केली होती. बाजारपेठेत गर्दी असली तरी पाडव्यानिमित्त खरेदी साठी ग्राहकांमध्ये अनुत्साह दिसून आला. याचा विपरीत परिणाम व्यापाऱ्यांच्या आर्थिक उलढालीवर झाल्याचे दिसून आले.

देखाव्यांचे खास आकर्षण
पालखी सोहळ्यानिमित्त बाजारात विविध ठिकाणी चित्रदेखावे साकारण्यात आले होते. वाळूचे किल्ले बनविण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी काही ठिकाणी लहान मुलांनी आकर्षक किल्ला देखावा साकारला होता. बाजारपेठेत सिंधुदुर्ग किल्ल्याचा आकर्षक देखावा साकारला होता. तर एकता मित्रमंडळाच्या वतीने भक्त प्रल्हादाच्या कथेवर आधारित चलचित्र देखावा साकारण्यात आला होता. तर देऊळवाडा येथे संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे स्थानिकांनी चिपी विमानतळाचा देखावा साकारला होता. तर दांडी किनारी वाळूची मंदिरे व आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त
या पालखी सोहळ्यात आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक दीपक पाटकर यांसह इतर लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, गावकर- मानकरी व भाविक सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत तसेच वाहतूक नियोजन करून सोहळा विनासायास पार पाडण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.