बाबरी पाडल्यानंतर नमाज बंद, पण हिंदूंची पूजा सुरूच राहिली; सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

775

बाबरी मशीद रामजन्मभूमीवरच उभारली गेली. ब्रिटिशांच्या राजवटीत येथे केवळ शुक्रवारचा नमाज व्हायचा. हिंदूसुद्धा पूजा करायचे. मशीद पडल्यानंतर मुस्लिमांनी नमाज बंद केला, मात्र हिंदूंनी रामजन्मभूमीवर पूजा सुरूच ठेवली, असा युक्तिवाद रामलल्लाचे भक्त गोपाल सिंह विशारद यांनी मुस्लिम साक्षीदाराचा संदर्भ देत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केला. त्यामुळे अयोध्येतील मंदिराच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाची दहाव्या दिवसाची सुनावणी झाली. यावेळी मूळ याचिकाकर्ते आणि रामलल्लाचे भक्त गोपाळ सिंह विशारद यांच्या वतीने ऍड. रंजित कुमार यांनी युक्तिवाद केला. मी रामलल्लाचा भक्त आहे. मला रामजन्मभूमीवर पूजेचा अधिकार आहे. हा माझा सामाजिक अधिकार आहे. हा अधिकार कोणीही हिसकावू शकत नाही. ही तीच जागा आहे, ज्या ठिकाणी भगवान रामचंद्र यांचा जन्म झाला होता. मी या जागेवर पूजेचा अधिकार मागत आहे, असे विशारद यांचे म्हणणे मांडतानाच ऍड. कुमार यांनी ‘रामलल्ला विराजमान’चे वकील के. प्रसारण आणि सी. एस. वैद्यनाथन यांच्या युक्तिवादाला सहमती दर्शवली. रामजन्मभूमी ही स्वतःच एक देवता असून केवळ मशिदीसारखी वास्तू उभारून या जागेवर कुणी हक्क सांगू शकत नाही, या ‘रामलल्ला विराजमान’च्या युक्तिवादाचे ऍड. कुमार यांनी समर्थन केले. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केली.

मुस्लिम साक्षीदाराने कबूल केली हिंदूंची पूजा
विशारद यांचे वकील ऍड. रंजित कुमार यांनी 80 वर्षांचे मुस्लिम साक्षीदार अब्दुल गनी यांच्या जबाबाचा संदर्भ दिला. रामजन्मभूमीवर हिंदू आधीपासून पूजा करायचे व बाबरी मशीद पडल्यानंतरही हिंदूंनी पूजा सुरूच ठेवली, असे गनी यांनी सांगितले होते. बाबरी मशीद पडल्यानंतर मुस्लिमांनी नमाज बंद केला, परंतु हिंदूंनी पूजा सुरूच ठेवली, अशी साक्ष गनी यांनी दिली होती. याकडे ऍड. रंजित कुमार यांनी लक्ष वेधताच न्यायालयाने गनी यांच्या उलटतपासणीबाबत विचारणा केली.

आपली प्रतिक्रिया द्या