रामलल्लांची स्थापना फायबर मंदिरात

673

अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिराच्या निर्मितीला सुरुवात होत असून मंदिर उभे राहीपर्यंत रामलल्लांची स्थापना फायबर मंदिरात करण्यात येणार आहे. 24 मार्च रोजी या फायबर मंदिरात रामलल्लांची स्थापना होणार असून हे मंदिर दिल्ली येथे बनविले जात असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आज दिली.

राममंदिराच्या निर्मितीसंदर्भात 4 एप्रिल रोजी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक होणार असल्याचे चंपत राय यांनी सांगितले. फायबर मंदिराची निर्मिती आणि याला राममंदिर परिसरात स्थापन करण्याचे काम सुरक्षा यंत्रणांवर सोपविण्यात आले आहे. ट्रस्टच्या अयोध्या कार्यालय भवनाची जागाही निश्चित करण्यात आली असून ही जागा राममंदिर प्रवेशद्वाराच्या चेकिंग पॉइंटवर आहे.

8 लाख 4982 रुपयांची देणगी
रामलल्ला मंदिराला 20 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत 8 लाख 4982 रुपये देणगी जमा झाली आहे. ही देणगी ट्रस्टच्या खात्यात गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या मोजणीनंतर जमा करण्यात आल्याचे ट्रस्टचे खाते संचालनाचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या