कोशिंबीर शिळी आहे असं सांगणाऱ्या ग्राहकाचं डोकं फोडलं, हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

ग्राहक हा राजा असतो, असं म्हणतात. त्यामुळे त्याच्या इच्छेला मान द्यावा असा सर्वसाधारण समज आहे. पण, कधीकधी मान राखणं तर दूरच ग्राहकाला हिंसेला सामोरं जावं लागतं. असाच एक प्रकार राजस्थानातील जोधपूर येथे घडला आहे.  ग्राहकाने फक्त तक्रार केली म्हणून हॉटेल मालकाने थेट त्याचं डोकं फोडल्याचं वृत्त आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, महेंद्र सिंह असं या पीडित व्यक्तिचं नाव आहे. महेंद्र हा जोधपूर येथील श्री खंगार जी नावाच्या हॉटेलमध्ये रात्रीचं भोजन करायला आला होता. त्याला जेवण वाढलं गेलं. पण, त्या जेवणातील कोशिंबिरीला वास येत होता. ती शिळी आहे हे लक्षात आल्यानंतर महेंद्र यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे याची तक्रार केली.

कर्मचाऱ्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने महेंद्र संतापला. त्याने कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. या वादात हॉटेलच्या मालकानेही उडी घेतली. पाहता पाहता वादाचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं आणि कर्मचारी व मालक यांनी मिळून महेंद्र याला मारहाण करायला सुरुवात केली.

ही मारहाण इतकी वाढली की हॉटेल मालकाने महेंद्रच्या डोक्यावर सोटा मारला. त्यामुळे महेंद्रच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या