साहित्य जगत: रंग आठवणींचे

>> रविप्रकाश कुलकर्णी

उषा मेहता यांचे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालेले ‘कोलाज’ पुस्तक म्हणजे गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा साहित्य जगतातला वावर, त्यांना भेटलेले लेखक, सुहृदांची शब्दचित्रे, आठवणी यांचा एक उत्तम संग्रह आहे. त्यात विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या कवींपासून ते शिरीष पै, विजया राजाध्यक्ष, निर्मला देशपांडे अशा लेखकांपर्यंत तसेच नेत्रा साठे, सुरेश गायकर अशा चित्रकारांचाही समावेश आहे. अविस्मरणीय शांताबाईंबद्दल लेखाच्या सुरुवातीलाच उषा मेहता लिहितात, ‘शांताबाईंची आणि आमची ओळख कधी झाली, कशी झाली, कशी वाढली, नेमकं काही आठवत नाही. आपण मोठय़ा साहित्यिकांना आधी त्यांना त्यांच्या साहित्यातून भेटतो, मग योग असतील तर प्रत्यक्ष भेट होते आणि त्यातूनही आणखीच भाग्ययोग असतील तर व्यक्तिगत स्नेहभावना निर्माण होण्याची आणि सहवासाची शक्यता असते. शांताबाईंच्या बाबतीत बहुधा असंच झालं असावं.’

वरील विशेष हा या पुस्तकातील लेखांचा लसावि म्हणता येईल. यानिमित्ताने उषा मेहता अनेक व्यक्तींच्या आठवणी सांगतात. कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने गोव्यात वृद्धांसाठी स्नेहमंदिर निर्माण झाले. याला साजेसे एखादे गीत असावे अशी कल्पना मोहनदास सुखटणकरांच्या मनात आली आणि ती त्यांनी कविवर्य शंकर वैद्य यांना सांगितली. वैद्य सरांनीही फार वेळ न घेता ती लिहून दिली. यासंबंधात उषा मेहता लिहितात, ‘आता हे गीत स्नेहमंदिरच्या प्रवेशद्वारी एका उत्तम लाकडी फलकावर सरांच्या हस्ताक्षरांत कोरून ठेवलं गेलं आहे. हे गीत कुठल्या संग्रहात आलेलं नसणार. म्हणून मुद्दाम उद्धृत करीत आहे.

कुणाची वीट आहे, कुणाची मृत्तिका आहे
कुणाचे साह्य द्रव्याचे, कुणाची भूमीही आहे
कितींनी ध्यास घेऊनी पुरे हे स्वप्न केलेले
हजारो हात लागोनी उभे मंदिर हे झाले
कवी ग्रेसबद्दल त्यांनी लिहिले आहे की, ‘पण एवढं सारं होऊनही काही कविता मात्र फार हट्टीपणे वागतात. प्रश्नचिन्ह होऊन घट्ट उभ्या राहतात, पण अशा काही वेळी मात्र या संगीतकारांच्या स्वरांनी काय जादू होऊन जाते कोण जाणे, एक मोठा भरजरी गुंता सरसर सुटत जातो आणि कोमल, सुगंधी फुलांचा झेला होऊन हृदयाला बिलगून बसतो.’
यासोबत ग्रेसच्या लहरीपणाच्या गोष्टी येण्ंढ अटळ आहेच. ख्यातनाम चित्रकार आणि कवी शांताराम पवार यांच्या या अनवट संग्रहाबद्दल उषा मेहता लिहितात, ‘या सचित्र कवितांकडे दुर्लक्ष करणं अशक्य झालं. परिस्थितीजन्य अगतिकतेला बळेबळे दडपून कोडगेपणाने जगण्याचा प्रयत्न करणाऱया आपल्या समाजाची अनेक प्रतिबिंब या त्यांच्या खास शैलीतल्या चित्रांसह असलेल्या कवितांमधून ठायी ठायी अस्वस्थ करू लागली.’ त्यांनी काही कवितांच्या ओळी उद्धृत केल्या आहेत. त्या वाचून अस्वस्थ व्हायला व्हावं. उषा मेहता यांची लेखातील काही निरीक्षणं पाहण्यासारखी आहेत. त्या सांगतात, “निर्मलाबाईंचं छोटंसं घर पाहिलं तर आश्चर्य वाटतं की, संसारातल्या सर्व आवश्यक जबाबदाऱया पार पाडून या बाईने हे एवढं लेखन या नाकपुडी एवढय़ा घरात कधी नि कसं केलं असेल!” पुढे त्या म्हणतात की, आता कादंबरीला नाव काय द्यायचं? नाव मला एकदम सुचलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना ते पसंत पडलं! हे नाव म्हणजे ‘सलत सूर सनईचा’.

अशा बारीकसारीक नोंदीसाठीदेखील कोलाजचं महत्त्व आहे. ‘कोलाज’मधील लेखात काही ठिकाणी आठवणींबाबत लिहिलं आहे ते वेधक आहे. उदा. त्या म्हणतात, “आठवणींची ही एक मजाच असते. काही आठवणी कायमच एकमेकीत मिसळून मनात रेंगाळत राहतात आणि काहीही कारण नसताना तरंगत आपल्या मनाच्या पृष्ठभागावर येऊन धडकतात.” एका लेखात त्यांनी म्हटलं आहे की, “चाहत्यांच्या मनातही कितीतरी आठवणी असतील. आठवणींना तसा अंतच नसतो. यापुढे त्या कुठेही, कधीही येतात, येत राहतात, येतच राहतील.”

एका लेखात त्यांनी म्हटलं आहे की, “ही माणसं जाऊन जाऊन जाणार कुठे? त्यांच्या आठवणींमधून ती आपल्या बरोबरच राहणार आहेत.” अशा आठवणी उषा मेहता यांनी नोंदवल्याने आयुष्य वाढलं आहे. हा पण कोलाजचा विशेष म्हणता येईल.