लेख -वाढत्या ‘पाऊसहानी’चे आव्हान

kerala-waynad

>> रंगनाथ कोकणे  

यंदा अति मुसळधार पाऊस पडण्यामागे प्रचंड उष्णता हेच मुख्य कारण आहे आणि परिणामी पृथ्वीला एका तप्त भट्टीचे रूप आले आहे. या कारणामुळे झालेले प्रचंड बाष्पीभवन हे कोठे ना कोठे मुसळधार पाऊस पाडणारे होते. या वेळच्या प्रचंड पावसामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर आणि नंतर उत्तराखंडमध्ये हाहाकारच उडाला नाही, तर केरळच्या वायनाडपासून आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा आदी ठिकाणी निसर्गाचा प्रकोप पाहावयास मिळाला. ग्लोबल वॉर्मिंगची ही देणगी आहे.

केरळमधील वायनाडनंतर त्रिपुरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस आणि महापूर आला. वास्तविक आपल्या देशाबरोबरच जगातील अनेक भागांत अतिवृष्टीच्या घटना घडत आहेत. या घटना निसर्गाचे रौद्ररूप सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदा अति मुसळधार पाऊस पडण्यामागे प्रचंड उष्णता हेच मुख्य कारण आहे आणि परिणामी पृथ्वीला एका तप्त भट्टीचे रूप आले आहे. या कारणामुळे झालेले प्रचंड बाष्पीभवन हे कोठे ना कोठे मुसळधार पाऊस पाडणारे होते. या वेळच्या प्रचंड पावसामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर आणि नंतर उत्तराखंडमध्ये हाहाकारच उडाला नाही, तर केरळच्या वायनाडपासून आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा आदी ठिकाणी निसर्गाचा प्रकोप पाहावयास मिळाला. ग्लोबल वॉर्मिंगची ही देणगी आहे. कधीही प्रचंड पाऊस पडला की, आपल्या पायाभूत सुविधांची दाणादाण उडते. अशा स्थितीत भविष्यात पायाभूत सुविधा योग्य रीत्या उभारल्या गेल्या नाहीत तर नुकसानीचे प्रमाण आणखी वाढू शकते. प्रत्यक्षात आपण पर्यावरण अनुपूल पायाभूत विकास करण्यापासून कोसो दूर आहोत. पायाभूत सुविधा आणताना याच  मुद्द्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. आता चांगल्या पद्धतीने पायाभूत विकासाचा पाया रचण्यासाठी सर्वंकष धोरणाची गरज आहे. या बळावरच नव्या नैसर्गिक परिस्थितीचा सामना करता येईल. खऱ्या अर्थाने गेल्या एक दशकात महापूर आणि प्रचंड पावसामुळे सर्वाधिक नुकसान पायाभूत सुविधांचेच झाले आहे.

आता अतिवृष्टीमुळे मालमत्तेसह मनुष्यहानीदेखील होत आहे. या वेळी पावसाने गेल्या काही दशकांच्या तुलनेत सर्वाधिक फटके दिले आहेत. देशातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र पावसाच्या तडाख्यात सापडले. वायनाड येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन तेथे मृतांची संख्या तीनशेवर पोचली आहे. अनेक गावे दबली गेली आहेत. बिहार आणि पंजाबमध्येदेखील पावसाने प्रचंड हानी झाली. उत्तराखंडमध्ये तर लोकांचे बळी गेले तर हिमाचलमध्येही मनुष्यहानी झाली आहे. हिमाचलमध्ये तर एक गाव पूर्णपणे गडप झाले. आता त्रिपुरात हलकल्लोळ उडाला आहे. पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरची शेत जमीन संकटात सापडली आहे. आर्थिक नुकसानीचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. किती जणांनी जीव गमावले आणि किती वित्तहानी झाली, त्याची आकडेवारी  आता पाऊस शेवटच्या टप्प्यात आल्यावरच कळेल.  या वेळी पाऊस बराच काळ राहिला तर नुकसानीचे प्रमाण वाढू शकते. अर्थातच त्याचा दोष अनियंत्रित विकासकामाला दिला जात आहे. यशिवाय जंगलतोड आणि पर्यावरण नियमांची पायमल्लीचेदेखील कारण सांगितले जात आहे. या गोष्टी सर्वांनाच आणखी चांगल्या रीतीने समजून घ्याव्या लागतील.

आपण आपल्या सुखसुविधांसाठी पृथ्वीच्या पोटातून गरजेपेक्षा अधिक स्रोतांचा उपसा करत आहोत. या कारणामुळे पृथ्वीच्या तापमानात अधिक वाढ नोंदली गेली. साहजिकच समुद्रावर अधिक परिणाम झाला. पृथ्वीवर समुद्राची व्याप्ती अधिक असल्याने ते उष्ण झाल्याने अल नीनोसारखे परिणाम समोर येत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम अधिक जाणवतात. प्रचंड उष्णता आणि  महापूर ही आजघडीला जगातील बहुतांश शहरांची समस्या बनली आहे. पूर्वी त्याचा फटका ग्रामीण भागाला बसायचा. मात्र या वेळी शहरालाही सोडले नाही. आपल्या शहरात पूर येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रस्त्यावर पाणी साचणे. शहरातील सांडपाण्याची व्यवस्था अतिशय वाईट आहे. कारण ती व्यवस्था उभी करताना कमी काळात  प्रचंड पाऊस पडेल याची कल्पना केलेली नसते. दहा वर्षांपूर्वी शहरात एवढा पाऊस पडत नसे यामागचे कारण म्हणजे शहरात वाढत्या तापमानामुळे निर्माण होणारा दबाव हा पावसाचे प्रमाण कमी ठेवायचा, परंतु काळानुसार हवामान बदलामुळे आता कोणीही सुरक्षित राहिलेले नाही हे स्पष्ट झाले. मर्यादेपेक्षा अधिक घाव निसर्गाला अमान्य आहेत. विकासाच्या नावावर निसर्गाची, पर्यावरणाची अपरिमित हानी केली गेली आहे. तसेच उपयुक्त पायाभूत सुविधा उभारणींकडे लक्ष दिले गेले नाही. अर्थात पावसाच्या भीतीने आपण विकासापासून दूर राहू शकत नाही. मानवाच्या विकासासाठी या गोष्टी अनिवार्य आहेत. हिमालय क्षेत्रापासून दक्षिण भारतापर्यंत हाच मुद्दा लागू आहे, परंतु एक मर्यादा ठेवत निसर्गाला धक्का लावण्याचे काम थांबवावे लागेल. अर्थात हे  काम सर्व देशांनी एकत्र येऊन करायला हवे. कारण एक देश सजग झाला तरी संकट टळणार नाही.

पर्यावरणाची हानी केल्याने आणि हवामान बदलामुळे आपण कोणत्याच वातावरणाचा चांगला रीतीने आनंद घेऊ शकत नसल्याची स्थिती आहे. पावसाळा हा एखाद्या नैसर्गिक संकटासारखा वाटत आहे. पूर्वी या गोष्टी पर्वतरांगांपर्यंत मर्यादित असायच्या. आता संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होत आहे. आता स्थितीतही बदल झाला आहे. अल नीनोनंतर ला नीना हा  परिणाम दाखवेल. तो हिवाळा आणखीच कडाक्याचा करेल. उन्हाळ्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. पूर्वी ज्या ऋतूला वसंत ऋतू म्हणायचो, तो आता वसंत राहिलेला नाही. निसर्गाच्या बदलत्या रूपाने आपली व्यवस्था  ढासळली गेली आहे. याउपरही आपल्याला काही समजत नसेल तर आगामी काळ आणखी भयावह राहू शकतो हे लक्षात घ्या. भूतकाळात पृथ्वीवरचे जीवन संपले तेव्हा त्याचे कारण ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या घटना होत्या. या वेळी पृथ्वीला संकटात टाकण्याला मनुष्यच कारणीभूत आहे. मनुष्य हा निसर्गाकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारण्याचे काम करत आहे.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)