
जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्राच्या क्रिकेट संघाने बुधवारी गुजरातवर 92 धावांनी दमदार विजय मिळवत सलग दुसऱयांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदाच्या लढतीत त्यांच्यासमोर बंगालचे आव्हान उभे ठाकणार आहे. राजकोट येथे 9 मार्चपासून अंतिम फेरीच्या लढतीला सुरुवात होईल. डावखुरा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकटने दुसऱया डावात 7 फलंदाज बाद करून गुजरातच्या डावाला सुरुंग लावला. त्याने लढतीत दहा फलंदाज बाद केले. पण दुसऱया डावात निर्णायक क्षणी 139 धावांची खेळी साकारणाऱया अर्पित वसावडाची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
पार्थिव, चिरागची झुंज
सौराष्ट्राने गुजरातसमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरातने पाचव्या दिवशी 1 बाद 7 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली, पण पार्थिव पटेल व चिराग गांधी यांचा अपवाद वगळता कोणालाही खेळपट्टीवर तग धरता आला नाही. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी रचली. चहापानानंतर जयदेव उनाडकटने पार्थिव पटेलला 93 धावांवर बाद करीत जोडी फोडली. यानंतर लढतीला कलाटणी मिळाली. पार्थिव पटेलने आपल्या खेळीत 13 चौकार मारले.
- गेल्या मोसमात विदर्भाकडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱया सौराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. कसोटीपटू चेतेश्वर पुजारा अंतिम लढतीत सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
14 धावांत निम्मा संघ गारद
पार्थिव पटेल बाद झाल्यानंतर गुजरातचा दुसरा डाव 234 धावांमध्येच गडगडला. 221 या धावसंख्येवर गुजरातचा सहावा बळी पार्थिव पटेलच्या रूपात बाद झाला. त्यानंतर अवघ्या 14 धावांमध्येच त्यांचा संघ गारद झाला. चिराग गांधीने 16 चौकारांसह 96 धावांची खेळी साकारली. जयदेव उनाडकटनेच त्याचा त्रिफळा उडवला. त्याने 56 धावा देत 7 फलंदाज बाद केले.

























































