चितळेंच्या दुधात काळा पदार्थ आढळल्याचे सांगून 20 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न

पुणे शहरातील नामांकित चितळे कंपनीच्या दुधात काळ्या रंगाचा सदृश्य पदार्थ आढळल्याचे सांगून, ब्लॅकमेल करत दुकान बंद पाडून बदनामी करण्याच्या धमकीने तब्बल 20 लाखाची खंडणी घेताना एका शिक्षिकेसह कुटुंबातील चौघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

करण सुनिल परदेशी (वय 22), सुनिल बेन्नी परदेशी (वय 49), पुनम सुनिल परदेशी (वय 27, सर्व रा. घोरपडी गाव मुंढवा), अक्षय मनोज कार्तिक (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे एरिया मॅनेजर नामदेव बाबुराव पवार (वय 63,रा.पिंपळे सौदागर) यांनी बिबेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी पूनम एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. चितळेंच्या दुधात काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला असून दुधात भेसळ करण्यात आली आहे, तसेच दूध खराब असल्याच्या ईमेल पूनमने 2 जूनला दुग्ध व्यावसायिकाच्या ग्राहकाच्या तक्रार निवारण केंद्राकडे पाठविला होता. तुमच्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलिसांकडे तक्रार करते, अशी धमकी तिने दिली होती. तुमची शहरातील दुकाने बंद करून, तुमची बदनामी करू, असे म्हणत तिने दूग्ध विक्री व्यावसायिकाकडे 20 लाखांची खंडणी मागितली होती.

याबाबत व्यावसायिक कंपनीचे सहायक विपणन प्रतिनिधी नामदेव पवार यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख यांनी याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांनी सापळा रचला. त्यानुसार 20 लाखांची खंडणी स्विकारताना आरोपी पूनम, तिचे वडील सुनील, भाऊ करण आणि बहीणीचा पती कार्तिक यांना गुन्हे शाखेने रंगेहात पकडले.

कुटुंबियाविरूद्ध यापुर्वीही गुन्हे दाखल

मारामारी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अक्षय कार्तिकविरोधात यापूर्वी वानवडी, मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय सुनील आणि करण यांच्याविरोधातही गुन्हे दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या