
पीडिता आणि अर्जदार यांच्यात प्रेमसंबंध होते. ते काही काळ एकत्र राहत होते. त्यामुळे तक्रारदार आणि अर्जदारातील सामंजस्य समझोत्यामुळे पीडितेने बलात्काराचा गुन्हा मागे घेतला असून तिला पुढील शिक्षणासाठी राज्याबाहेर जायचे आहे. हा खटला असाच सुरू ठेवल्यास पीडितेलाच याचा मानसिक त्रास होईल, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने अर्जदाराविरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
अर्जदाराविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. गणेश गुप्ता, अॅड. दीपक गुप्ता व अॅड. मदन खनसोले यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला माहिती देण्यात आली की, अर्जदार आणि पीडिता यांच्यात प्रेमसंबध होते. नंतर निर्माण झालेल्या गैरसमजातून तक्रार दाखल करण्यात आली. मात्र कालांतराने दोघांनी समझोता केला असून तक्रार मागे घेण्याबाबत पीडितेने प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. याचिकाकर्त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने बलात्काराचा गुन्हा व आरोपपत्र रद्द करण्याचे आदेश पोलीसांना दिले तसेच अर्जदारावर एक लाखाचा दंड लावण्यात आला असून हा निधी दीपस्तंभ फाऊंडेशन, दिल्ली या संस्थेकडे जमा करण्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
























































