
रिसगाव, एमआयडीसी, मोहोपाडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या घरफोड्याच्या रसायनी पोलिसांनी मध्य प्रदेशातून मुसक्या आवळल्या आहेत. प्रकाश आलवा असे या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला धार जिल्ह्याच्या कुक्षी तालुक्यातील बगोली येथून अटक केली. तो ‘धार गँग’ या आंतरराष्ट्रीय टोळीतील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व एक दुचाकी जप्त केली आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
रसायनीत एका पाठोपाठ चार घरफोडीच्या घटना घडल्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पथक रवाना केले. या पथकाने तांत्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्हीच्या मदतीने मागोवा घेत थेट मध्य प्रदेश गाठले. यावेळी उपनिरीक्षक मंगेश बचाकर यांच्या पथकाने सापळा रचत प्रकाश आलवाला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच प्रकाशने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. या घरफोडीत टोळीतील मुख्य सूत्रधार सुरेश शेंगार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सुरेश हा कर्नाटक कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यालाही ताब्यात घेतले आहे.

























































