>> रश्मी वारंग
स्त्री शक्तीचा जागर करणारा नवरात्रोत्सव आपण उत्साहात साजरा करत आहोत. आपल्या लाडक्या आराध्य देवतेचे कौतुक करण्याचे हे दिवस. महाराष्ट्राच्या प्रमुख साडेतीन शक्तिपीठांत विराजलेल्या देवींच्या नैवेद्याबद्दल आपल्याला जे जे प्रिय ते ते आपल्या आराध्याला देण्याचा आनंद काही वेगळाच. देवी-देवतांचा हा नैवैद्य म्हणजे आपला भक्तिभाव व्यक्त करण्याची पद्धत.
स्त्री शक्तीचा जागर करणारा नवरात्रोत्सव आपण उत्साहात साजरा करत आहोत. आपल्या लाडक्या आराध्य देवतेला साडीचोळी नेसवून खणानारळाने ओटी भरून जसा भक्तिभाव व्यक्त केला जातो, तसाच तो व्यक्त होतो तिला दिल्या जाणाऱया नैवेद्यातून. महाराष्ट्राच्या प्रमुख साडेतीन शक्तिपीठांत विराजलेल्या देवींच्या नैवेद्याबद्दल जाणून घेणं म्हणूनच औचित्याचं ठरावं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असणाऱया तुळजाभवानीला शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही पद्धतींचा नैवेद्य दिला जातो. त्यामागे असलेली कहाणी अशी की, महिषासुराचा वध कोणत्याही देवांच्या नाही, तर देवतेच्याच हातून होऊ शकतो हे जाणल्यावर देवी तुळजाभवानीने त्याच्याशी युद्ध आरंभले. दसऱयाच्या दिवशी त्याचा वध होणार हे त्याला जाणवल्यावर तो शरण आला आणि आपले गर्वहरण झाले असे म्हणू लागला. त्याने शेवटची इच्छा व्यक्त केली की, माझा भोग, नैवेद्य देवीला चढवला जावा. त्या आख्यायिकेमुळे तुळजाभवानीला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो. तो देवीच्या मुखाजवळ नेला जात नाही. अन्य शाकाहारी नैवेद्य देवीला अर्पण केला जातो.
कोल्हापूर निवासिनी अंबाबाई हिचा नैवेद्यही खास असतो. दररोज अंबाबाईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो ज्याला महानैवेद्य म्हणतात. हा दुपारी साडेबाराला अर्पण केला जातो, तर रात्री साडेआठच्या दरम्यान फराळाचा नैवेद्य असतो. त्यात लाडू, करंज्यांचा समावेश असतो. सणासुदीला पंचपक्वान्नांचा नैवेद्य असतो. धनुर्मासात सकाळी बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, लोणी असा नैवेद्य अंबाबाईला दाखवतात. दीडशे वर्षे एकाच कुटुंबाकडे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे.
कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत हे रेणुका मातेचे मंदिर आहे. या ठिकाणी ही आंबिल यात्रा मार्गशीर्षमध्ये भरते. यात्रेच्या दिवशी रेणुका देवीचे आवडते अन्नपदार्थ दहीभात, आंबील, वडी-भाकरी, वरणा-वांग्याची भाजी, मेथीची भाजी, गाजर, केळी, कांद्याची पात, लिंबू अशा भाज्या आणि फळे देवीला अर्पण केली जातात. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरची रेणुका. या मंदिरात विडा तांबुलचे महत्त्व विलक्षण आहे. देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी तो एक मानला जातो. ठिकठिकाणाहून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात. या विडय़ाला भौगोलिक मानचिन्ह, जीआय टॅग मिळाला आहे. देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून झाला की, खलबत्त्यात कुटून हा मानाचा विडा दिला जातो.
वास्तविक देव भावाचा भुकेला असतो. तरी आपल्याला जे जे प्रिय ते ते आपल्या आराध्याला देण्याचा आनंद काही वेगळाच. देवी-देवतांचा हा नैवैद्य म्हणजे आपला भक्तिभाव व्यक्त करण्याची पद्धत. आपण अर्पण केलेला नैवेद्य देवी खात नसली तरी भक्ताच्या चेहऱयावरील अर्पण भाव तिला समजत असावा. कारण भक्ताच्या चेहऱयावरील हा आनंद मग देवीच्या चेहऱयावर प्रगटतो आणि तिचं तेज पाहून आपणही नतमस्तक होत म्हणतो,
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम
(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)