वायर्स, टपाल, महत्त्वाची कागदपत्रे कुरतडली; उंदीरमामांनी भाईंदरचे पोस्ट कार्यालय पाडले बंद

471

विघ्नहर्त्या गणेशाचे वाहक म्हणून उंदीरमामाची ओळख आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाच्या या मूषकराजाचीही घराघरात मनोभावे पूजाअर्चा केली जाते, पण त्याच्या करामतींनी भाईंदरमधील पोस्टमन काकांच्या कपाळावर चक्क आठय़ा उमटल्या आहेत. कारण देखील तसेच आहे. वायर्स, टपाल, महत्त्वाची कागदपत्रे कुरतडून उंदरांनी येथील टपाल कार्यालयाची पुरती दैना उडवली आहे. त्यामुळे एकमेव असलेल्या या पोस्ट ऑफिसचा कारभार तीन दिवसांपासून ठप्प पडला आहे.

भाईंदर पश्चिम येथील हे अतिशय जुने पोस्ट ऑफिस आहे. या ठिकाणी पोस्टमास्तरसह 18 कर्मचारी काम करत असून एकमेव पोस्ट कार्यालय असल्याने कामाचा प्रचंड ताण असतो. प्रतिदिनी शेकडो टपालांची आवक-जावक होते. त्याशिवाय स्पीड पोस्ट, कुरियर आदी कामेसुद्धा असतात. 21 सप्टेंबर रोजी कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आले असताना त्यांना संगणकाच्या, वीजजोडणीच्या वायर्स तसेच अनेक कागदपत्रे, टपाल तसेच तत्सम साहित्य उंदरांनी कुरतडून टाकल्याचे निदर्शनास आले. नासधूस झाल्याने आता काम तरी कसे करायचे, असा प्रश्न कर्मचाऱयांना पडला. त्यामुळे दुरुस्तीसाठी शनिवार, सोमवार आणि रविवारची सुट्टी असे तीन दिवस कार्यालय बंद ठेवण्यात आले. उंदीरमामांच्या या उठाठेवीने मात्र पोस्ट कार्यालयाचा संपूर्ण कारभारच ठप्प पडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या