ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन हिंदुस्थानचे उद्योग महर्षी रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा हे कायम त्यांच्या दानशूरपणासाठी ओळखले जातील. रतन टाटा यांचे मन एवढे मोठे आहे की ज्या कंपनीने त्यांचा अपमान केलेला त्या कंपनीला देखील त्यांनी त्यांच्या वाईट काळात मदत करत पुन्हा उभारले
रतन टाटा यांनी 1990 च्या दशकात टाटा इंडिका ही हिंदुस्थानातील पहिली स्वदेशी कार विकसीत केली. मात्र अपेक्षेप्रमाणे गाडीची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे रतन टाटा यांनी पॅसेंजर कारचा व्यवसाय अमेरिकेतील नामांकीत कार उत्पादक कंपनी फोर्ड मोटर्सला विकण्याचा निर्णय घेतला. मात्र फोर्डचे गर्विष्ठ चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की जर मी तुमच्यासोबत हा करार केला, तर तुमच्यावर उपकार होतील. बिल फोर्ड यांचे हे वक्तव्य रतन टाटा यांच्या मनाला लागले, त्यांच्या मनात अपमानाची भावना निर्माण झाली. मात्र शांत संयमी रतन टाटांनी त्यांना प्रत्युत्तर दिले नाही. ते हिंदुस्थानात आले आणि मोठ्या जोमाने पुन्हा कामाला सुरुवात केली.
कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या जोरावर रतन टाटा यांनी 9 वर्ष खडतर मेहनत घेतली. त्याचं फळ म्हणजे 2008 साली टाटा मोटर्सचा जगभरातील बाजारपेठांमध्ये वाजलेला डंका. विशेष बाब म्हणजे कंपनीच्या गाड्या या वेस्ट सेलिंग श्रेणीत अव्वल ठरल्या. रतन टाटा यांनी यानंतर मागे वळून पाहिले नाही. नवनवीन बदल करायला त्यांनी सुरुवात केली. सामान्य माणसांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी वाहनांची निर्मिती करण्याला प्राधान्य दिले. रतन टाटा यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वामुळे टाटा मोटर्सचा जगभरात डंका वाजत होता. मात्र रतन टाटा यांची खिल्ली उडवणाऱ्या बिल फोर्ड यांच्या कंपनीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.
त्यावेळी त्यांनी ऑक्सिजनवर असणाऱ्या फोर्ड कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी मदताची हात पुढे केला. 2008 साली रतट टाटा यांनी फोर्ड कंपनी तोट्यात असताना सुद्धा कंपनीची सर्वात लोकप्रिय आणि महागडा ब्रँड Jaguar आणि Land Rover विकत घेण्याची ऑफर दिली. बिल फोर्ड यांच्याकडे हातमिळवणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यासाठी बिल फोर्ड संपूर्ण टीम घेऊन मुंबईत दाखल झाले. अशा प्रकारे रतन टाटा यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीने अपमानाचा बदला घेतला.