हिंदुस्थानच्या औद्योगिक क्षितिजावरील तेजस्वी सूर्य निमाला, रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हिंदुस्थानच्या औद्योगिक क्षितिजावरील तेजस्वी सूर्य निमाला. टाटा समूहाचे आधारवड आणि तमाम देशवासीयांचे प्रेरणास्थान जगविख्यात उद्योगपती रतन टाटा आज इहलोकीचे कार्य संपवून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. लाखोंच्या पोशिंद्याला अखेरचा निरोप द्यायला जनसागर उसळला. केवळ रोजगारच नव्हे तर अगणित स्वप्नं देणाऱया उद्योगमहर्षीला साश्रू नयनांनी अलविदा करण्यात आले. अरबी समुद्राच्या साक्षीने रतन टाटांचे पार्थिव निघाले आणि ‘रतन टाटा अमर रहे’चा जयघोष झाला. वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघा देश शोकसागरात बुडाला.

उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सारे शोकविव्हळ झाले. गौरवास्पद कामगिरीने देशाचा लौकिक वाढवणाऱ्या टाटांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. काल रात्री त्यांचे पार्थिव ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर एनसीपीए येथे गुरुवारी सकाळपासून सर्वसामान्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांची अखेरची छबी डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी केवळ उद्योगपती किंवा सेलिब्रेटीच नव्हे तर सर्वसामान्यांची पावले एनसीपीएकडे वळली. एनसीपीएच्या प्रवेशद्वारांसमोर रांगा लागल्या. आपल्या प्रेरणास्थानाला अखेरचे पाहताना अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी एनसीपीएत सर्वधर्मीय प्रार्थना झाली. त्यानंतर तिरंग्यात लपेटलेले रतन टाटा यांचे पार्थिव सजवलेल्या गाडीतून वरळी स्मशानभूमीच्या दिशेने निघाले. नरीमन पॉईंटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून लोकांनी मानवंदना दिली. वरळी स्मशानभूमीजवळ सामान्यांचीही मोठी गर्दी झाली. वरळी स्मशानभूमीत पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

टाटासाहेब अनेक वर्षे युवकांना प्रेरणा देत राहतील, उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

उद्योगक्षेत्रात भारताला रत्नाचे तेज प्राप्त करून देणारे कर्तुत्ववान आणि सहृदयी टाटासाहेब पुढेदेखील अनेक वर्षे देशातील युवकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी टाटांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. टाटा यांचे फोटो काढण्याचे भाग्यही मला लाभले, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.