रतन टाटा म्हणजे दिलदार व्यक्तीमत्व. देशावर कोणतंही संकट आलं की मदतीसाठी येणारा पहिला हात हा कायम रतन टाटा यांचाच होता. त्यामुळे ते केवळ एक उद्योजक म्हणून नव्हे तर सच्चा दानशूर माणूस, देवमाणूसच्या रुपात कायम लक्षात राहणार आहेत. त्यांचे संपूर्ण कार्य अविस्मरणीय आहे. खासकरून त्यांची पाच कामे देश कधीच विसरु शकणार नाही.
1. कोरोना महामारीत केलेले भरीव मदतकार्य
कोरोना महामारीने संपूर्ण जगाची घडी कोलमडून गेली होती. इतर देशांबरोबरच हिंदुस्थानला महामारीचा फटका बसला. विशेष सर्वसामान्य, गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला होता. महामारीच्या भीषण संकटात उद्योग विश्वातून सर्वात आधी मदतीसाठी पुढे सरसावले ते रतन टाटा. त्यांनी देशाला तब्बल 500 कोटी रुपयांची मदत केली. कोरोना महामारी आपल्यापुढील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या भूतकाळातही देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. यावेळची परिस्थिती इतर वेळेपेक्षा अधिक चिंतेची आहे, असे रतन टाटा यांनी त्यावेळी ‘एक्स’वर लिहिले होते.
2. कुत्र्यांसाठी नवी मुंबईत स्थापन केले रुग्णालय
रतन टाटा यांनी माणुसकी धर्म जपतानाच भूतदयेलाही तितकेच महत्व दिले. ते कुत्र्यांवर विशेष प्रेम करायचे. याच प्रेमातून अलीकडेच त्यांनी नवी मुंबईत एक कुत्र्यांचे विशेष रुग्णालय सुरु केले आहे. कुत्र्यांना मी कुटुंबातील सदस्य मानतो, असे उदगार त्यांनी रुग्णालय उदघाटनप्रसंगी काढले होते. रुग्णालयाच्या पाचमजली इमारतीत 200 पाळीव प्राण्यांवर उपचार केले जाऊ शकतात. रतन टाटा यांनी 165 कोटी रुपये खर्च करून या रुग्णालयाची उभारणी केली आहे.
3. देशात सर्वात स्वस्त कारची निर्मिती
टाटा समूह पूर्वी केवळ मोठ्या वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखला जायचा. पण 1998 मध्ये रतन टाटा यांनी छोट्या वाहनांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि टाटा इंडिका बाजारात आणली. ‘टाटा इंडिका’ पूर्णपणे स्वदेशी कार होती. ही कार फार लोकप्रिय ठरली. या कारच्या विक्रीने बाजारात नवा विक्रम प्रस्थापित केला. नंतर दहा वर्षांनी टाटांनी आणखी एक प्रयोग केला आणि 2008 मध्ये नॅनो कार बाजारात आणली. ही कार अवघ्या 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध करण्याची किमया रतन टाटा यांनी केली.
4. फोर्ड कंपनीला संकटातून बाहेर काढले
टाटाने 1999 मध्ये बिल फोर्डला टाटा इंडिका विकण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे रतन टाटा यांना मोठा धक्का बसला होता. यावेळी बिल फोर्ड यांनी उपहासात्मक टीका टाटावर केली होती. जर प्रवासी वाहन बनवण्याचा अनुभव नव्हता, तर त्यांनी हा बालिशपणा का केला? असे बिल फोर्ड म्हणाले. ही बाब रतन टाटा यांच्या काळजात रुतली आणि त्यांनी कंपनी विकण्यास नकार दिला. एका दशकानंतर काळ बदलला आणि फोर्ड मोटर्सची स्थिती बिघडली. त्यामुळे फोर्ड विकावी लागली आणि रतन टाटांनी ती विकत घेतली.
5. देशातील TCS सारख्या मोठ्या IT कंपन्या
भारतातील सॉफ्टवेअर कंपनीचा उल्लेख होताच लोकांच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे TCS. TCS ही जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग सेवा कंपन्यांपैकी एक आहे. ज्याने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली आहे.