पतितपावन मंदिरात भजन रोखणाऱ्या भाजपविरोधात संताप, ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ म्हणत भजनी बुवांनी उपसले आंदोलनाचे अस्त्र

सर्व जातींतील बांधवांसाठी भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या रत्नागिरीतील पतितपावन मंदिरात भजनाला अटकाव केल्यानंतर भजनी बुवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भजनी बुवांनी या प्रकरणाचा निषेध करत भजन करत निषेध दिंडी काढली. भजनी बुवा संतापले असून हे प्रकरण आता पेटणार आहे. ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ म्हणत आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे.

रत्नागिरीतील पतितपावन मंदिरात भजन करण्यास भजनी मंडळींना भाजप नेते अॅड.बाबा परुळेकर यांनी अटकाव केल्याची लेखी तक्रार भजनीबुवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे यांनी सारवासारव करत खुलासाही केला होता.त्या खुलाशावर भजनी बुवा शांत बसले नाहीत.सर्व जातींतील बांधवांसाठी भागोजीशेठ कीर यांनी खुल्या केलेल्या मंदिरात भजनी बुवांनाच भजन करण्यास नकार दिल्याने भजनी बुवांनी आता संघर्षाची भूमिका घेतली आहे.

भजनी बुवा व मंडळींनी एकत्र येत पतितपावन मंदिरात जाऊन देवतांची पूजा केली आणि भजन केले. त्यानंतर पतितपावन मंदिर ते सावरकर चौक व त्या ठिकाणाहून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत निषेध दिंडी काढली. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील अनेक भजनी बुवा सहभागी झाले होते. महिला भजनी मंडळींनीही या निषेध दिंडीत सहभाग घेतला. साईनाथ नागवेकर, जयवंतबुवा बोरकर, वासुदेव वाघे बुवा, सुदेश नागवेकर, मनोज बुवा भाटकर, विजय मयेकर, सावंत देसाई बुवा, उल्हास लाड बुवा, श्रीराम नाखरेकर, राजू कीर, रघुवीर शेलार, सुधीर वासावे, बी.टी. मोरे, काwस्तुभ नागवेकर, नितीन तळेकर, बंटी कीर, अमृता मायनाक, सुषमा भाटकर, योगेश वाघधरे, बंडय़ा सुर्वे, किशोर मायनाक, संतोष चव्हाण, सुरेश शेटये यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक व भजनी मंडळी या वेळी उपस्थित होते. पतितपावन मंदिरापासून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत दिंडी काढल्याने शहरवासीयांचे लक्ष या निषेध दिंडीने वेधून घेतले.