रत्नागिरीची मतमोजणीची तयारी पूर्ण; विनायक राऊत यांचे पारडे जड

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून भारतीय अन्न महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी 1058 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी 350 पोलीस तैनात आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात आहे. एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत. सध्या महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांचे पारडे जड आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान 62.52 टक्के झाले. 14 लाख 51 हजार 945 मतदारांपैकी 9 लाख 7 हजार 618 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामध्ये 4 लाख 59 हजार 104 पुरूष मतदार आणि 4 लाख 48 हजार 513 महिला मतदार होते. 4 जून रोजी सकाळी 7 वाजता मतमोजणी कक्षाचे दरवाजे उघडतील.सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात टपाली मतांची मोजणी होईल. त्याचवेळी 99 टेबलवर मतमोजणी सुरू होईल. चिपळूण मतदारसंघाच्या 24 फेऱ्या, रत्नागिरीच्या 25 फेऱ्या, राजापूरच्या 25 फेऱ्या, कणकवलीच्या 25 फेऱ्या, कुडाळच्या 20 फेऱ्या आणि सावंतवाडीच्या 22 फेऱ्या होणार आहेत. एकूण 1942 मतदान केंद्राच्या 140 फेऱ्या होणार आहेत.

4 जूनला निकाल जाहिर झाल्यानंतर त्याच दिवशी विजयी मिरवणूक काढण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. मतमोजणी केंद्राजवळ 50 पोलीस अधिकारी आणि 310 पोलीस अमंलदार बंदोबस्तात व्यस्त रहाणार आहेत. मतमोजणी केंद्रात त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था आहे. कार्यकर्त्यांना निकाल ऐकण्यासाठी वेगवेगळी जागा दिली आहे. सिध्दीविनायक लॉंड्रीजवळील परिसरात वंचित आघाडी आणि अपक्ष उमेदवारांसाठी जागा दिली गेली आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी जीएफ कंपनीची मोकळी जागा आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी यश हॉटेल समोरील स्वतंत्र जागा देण्यात आली आहे.