Ratnagiri News – कडवईत शिवसेना-मनसे-वंचितचा नियोजनबद्ध प्रचार, उमेदवारांचा मतदारांशी थेट संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडवई जिल्हा परिषद गटात सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीकडून मतदारसंघात नियोजनबद्ध प्रचार सुरू असून, या प्रचाराला मतदारांचा वाढता प्रतिसाद गिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

कडवई जिल्हा परिषद गटातून संतोष धेराडे, धामणी पंचायत समितीतून दत्ताराम लाखण, तर कडवई पंचायत समितीतून अपर्णा जाधव हे उमेदवार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-मनसे-वंचित युतीच्यावतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कडवई जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून, मनसे व वंचित आघाडीची साथ लाभल्याने हा गट अधिक भक्कम झाल्याचे राजकीय चित्र आहे.

संतोष थेराडे आणि जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात प्रचाराची प्रभावी आखणी करण्यात आली असून, घराघरांत संपर्क साधत मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. बहुतांश ठिकाणी या युतीने निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसून येत असून, या गटात महायुती आणि शिवसेना-मनसे वंचित युती यांच्यात थेट लढत रंगली आहे. संतोष थेराडे यांनी यापूर्वी केलेली विकासकामे, तसेच जितेंद्र चव्हाण आणि थेराडे यांचा सातत्यपूर्ण जनसंपर्क व कार्यपद्धती यामुळे या युतीला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

प्रचाराच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन करून घरोघरी प्रचाराचे तंत्र वापरण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्या वाहनांसह उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रॅलीत जितेंद्र चव्हाण, संकेत थेराडे, अनंत उजगावकर, अजिंक्य ब्रीद, गजानन तुळसनकर, संदीप मादगे, हरिश्चंद्र धामनाक, प्रदीप चौघुले, महेंद्र मादगे, विजय उजगावकर, फिरदोस खान, सागर भोजने, अनंत चांदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.