रत्नागिरी – विद्यार्थ्यांच्या घशाखाली उतरेना, पोषण आहारात कच्चा भात आणि बेचव वरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेंट्रल किचनच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील शाळांना मध्यान्ह भोजन वाटप करण्याच्या पहिल्याच दिवशी रा. भा. शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांना कच्चा भात, बेचव वरण देण्यात आले.

हा बेचव पोषण आहार विद्यार्थ्यांच्या घशाच्या खाली उतरला नाही. या सर्व प्रकारामुळे पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संबंधित ठेकेदाराचा पोषण आहाराचा ठेका रद्द करून जुन्या पद्धतीने पोषण आहाराचे वितरण सुरु ठेवावे अशी मागणी शिक्षण संस्था चालक आणि शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे.

पोषण आहाराच्या वितरणाची जबाबदारी पूर्वी महिला बचत गटांकडे होती. आता त्यामध्ये बदल करून निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. या ठेकेदाराने रा. भा. शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांना दिलेला पोषण आहार हा बेचव होता. भात कच्चा होता तर वरण बेचव होते. विद्यार्थ्यांनी हा पोषण आहार खाल्ला नाही. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती पाहिली.

या सर्व प्रकारानंतर शाळा व्यवस्थापनाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून सेंट्रल किचनमधून वितरण होणारा पोषण आहार रद्द करून जुन्या पद्धतीने पोषण आहार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.