दोन तालुक्यांना जोडणारा पूल नागरिकांची मागणी पूर्ण होणार – उदय सामंत

447

मुचकुंदी नदीवर होणाऱ्या पुलाचे भूमिपूजन झाल्याने या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. या पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

नाबार्ड अंतर्गत दोन कोटी 75 लक्ष रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात येणार आहे. सोबतच गुरववाडी धामणवाडी धावजी मंदिर या पाच किलोमीटर मार्गाचे कामही सुरू झाले आहे. या कामाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात आला आहे. या नदीवर पूल असावा अशी नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. मुचकुंदी नदी मासाळ येथून निघते या गावाचा रस्ता आणि तेथे धरण यांची कामे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

या रस्त्यावर पुलाच्या बांधकामामुळे मतदारसंघातील खूप मोठी मागणी पूर्ण होत आहे. याचा आपल्याला आनंद आहे, असे या भागातील आमदार राजन साळवी यावेळी म्हणाले. दुसऱ्या बाजूस 600 मीटर रस्ता प्रस्तावित आहे त्यासाठीचा निधी आपण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन उदय सामंत यांनी यावेळी दिले. हा रस्ता पूर्ण झाल्यावर थेट दोन तालुके जोडले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या