मजुरांना नेपाळ येथे घेऊन निघालेली खासगी बस भोस्ते घाटात उलटली

938

रत्नागिरी येथून मजुरांना घेऊन नेपाळ हद्दीवर निघालेल्या खासगी आरामबसला खेड नजिकच्या भोस्ते घाटात अपघात झाला. एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनसार रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणाऱ्या नेपाळी मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी एक खासगी बस भाड्याने ठरवली होती. प्रत्येक मजुराकडून सात हजार रुपये भाडे घेऊन जोतिल्लिंग टूब्हल्स कंपनीची खासगी बस या मजुरांना नेपाळच्या हद्दीवर नेऊन सोडणार होती. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथून सुटलेल्या या बसमध्ये 40 प्रवासी आणि काही लहान मुले होती. आपल्या कुटुंबासह गावाकडे जाण्यासाठी निघालेली ही रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाट उतरवत होती. ही बस एका अवघड वळणार आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलटी झाली. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून हे प्रवाशी या जीवघेण्या अपघातातून बचावले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशी वाहतुकीला जे नियम घालून दिले आहेत त्या नुसार बसमधून केवळ 22 प्रवाशांच्या वाहतुकीला परवानगी आहे. त्यामुळे या बसमधून 40 प्रवासी आणि काही लहान मुलांना प्रवास करण्याची परवानगी कशी दिली गेली हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

भोस्ते घाटात खासगी आराम बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच खेड येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांची विचारपूस करून त्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली. ज्या वळणावर हा अपघात झाला त्याच वळणावर गेल्या एका महिन्यात सहा अपघात झाले आहेत. महामार्ग चौपदरीकरणादरम्यान तयार करण्यात आलेले हे वळण अतिशय धोकादायक असल्याने त्याच ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या