
राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण विकास भोवड असे या मयत मुलाचे नाव असून या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
देवीहसोळ गावातील लिंगवाडीतील विकास भोवड यांचा मुलगा श्रवण याला सर्पदंश झाला होता. श्रवणला सर्पदंश झाल्याची कल्पना सुरुवातीला कुणालाच आली नाही. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होण्यास बराच विलंब झाला आणि त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. त्याला त्रास जाणवू लागल्यानंतर कुटुंबियांनी त्याला उपारासाठी रूग्णालयात दाखल केले.
रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयात तपासणी अंती श्रवण याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपार सुरू होते. श्रवणला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र शुकवार 8 ऑगस्ट रोजी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. मनमिळावू, शांत आणि सर्वांच्या सोबत मिळून-मिसळून राहणाऱ्या श्रवणच्या अशा दुर्दैवी निधनाने संपूर्ण देवीहसोळ गाव शोकसागरात बुडाला आहे.