Ratnagiri News – देवरुख बावनदीवर उभारण्यात येणाऱ्या धरणाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप, 6 कोटींचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरुख शहराला २४ तास व सातही दिवस अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत बावनदी पात्रात उभारण्यात येत असलेल्या धरणाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.

सुमारे ६ कोटी रुपयांची ही योजना असून काम पूर्ण होईपर्यंत खर्च ७ ते ८ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. देवरुख शहरासाठी २४ तास पाणीपुरवठा ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, तिला मंजुरी व निधी उपलब्ध होणे ही बाब अभिनंदनीय आहे. मात्र, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या निधीतून होणारे काम दर्जेदार, टिकाऊ व सुरक्षित असणे तितकेच आवश्यक असल्याचा नागरिकांचा आग्रह आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेचे नगरसेवक अनुराग कोचिरकर, अक्षय झेपले, सिद्धेश वेल्हाळ, सागर संसारे तसेच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते अजित गवाणकर व इस्तियाक कापडी यांनी संयुक्तपणे धरणाच्या कामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान या कामावर ठेकेदाराकडून कोणत्याही अभियंत्याची नियुक्ती केली नसल्याचा आरोप करण्यात आला. नगरपंचायतीचे अभियंता देखील नियमित पाहणीस जात नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामाचा दर्जा पूर्णतः कामगारांवर अवलंबून असल्याची स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

धरणाच्या पायासाठी वापरण्यात येणारे स्टील अपेक्षित दर्जाचे नसून काही ठिकाणी गंजलेले स्टील वापरण्यात येत असल्याचे आरोप होतं आहेत. देवरुख धरणाच्या बांधकामात वापरण्यात येणारे दर्जाहीन गंजलेले स्टील पाहणीत आढळल्याचा दावा नगरसेवकांनी केला, तसेच पाया भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली आहे. ही योजना निविदा प्रक्रियेतून देण्यात आली असून, ठेकेदाराने शासनाने जाहीर केलेल्या रकमेपेक्षा १४ टक्के कमी दराने काम घेतले आहे. त्यामुळे कमी दरामुळे कामाच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

बावनदी ही तालुक्यातील मोठी नदी असून पावसाळ्यात तिला प्रचंड पूर येतो. यापूर्वी या नदीने अनेक लोखंडी साकव वाहून नेले असून, निवधे, कासार कोळवण व परशुराम एरंडेवाडी परिसराचा संपर्क तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा धोकादायक नदीवर धरण उभारले जात असल्याने बांधकाम मजबूत व सुरक्षित असणे गरजेचे असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. पशुरामवाडी येथील धरणाकडे पाठवण्यात येणार असून, त्यातून देवरुख शहराची संपूर्ण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे या धरणाच्या मजबुतीकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आमदार शेखर निकम यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांनी स्वतः या कामाची पाहणी करावी, तसेच पालकमंत्र्यांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. काम दर्जात्मक पद्धतीने होत नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करून शासनाच्या व जनतेच्या पैशांचा अपव्यय थांबवावा, अन्यथा योजना “जैसे थे” स्थितीत राहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. या योजनेचा मुख्य उद्देश देवरुख शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे हाच असून, तो उद्देश पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा नगरसेवकांनी बोलताना व्यक्त केली.