
दिवाळी सुट्टीनिमित्त आंजर्ले येथील सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी उसळली आहे. सुट्टीच्या कालावधीत दापोलीत मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. येथील समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरतात. दापोली हे उत्तर कोकणातील महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. आंजर्ले या गावाचे मूळ नाव अजरालय असे होते. सध्या आंजर्ले हे नाव प्रचलित झाले आहे. त्याच आंजर्ल्यात एका टेकडीवर श्री गजानन विराजमान आहेत. त्याला सारे जण कडयावरचा गणपती असे म्हणतात.
या कड्यावरच्या गणपतीची आख्यायिका अशी सांगितली जाते की, आंजर्ले येथील समुद्रकिनारा अवाढव्य व विस्तिर्ण होता. किनाच्यावर दोन मंदिरे होती. एक श्री सिद्धिविनायकाचे आणि दूसरे आंजर्लेश्वर म्हणजे शंभू महादेवाचे, कालांतराने समुद्राची वाढ झाली तशी मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली. मंदिरे समुद्रात जाताच श्री सिद्धिविनायकाने किनाऱ्यासमोरच्या कडयावर जाऊन मुक्काम केला, एका कातळावर उमटलेले पाऊल हे श्री सिद्धिविनायकाचे असून समुद्रातून वर येताना हे पाऊल उमटलेले आहे, असा श्री गणेशभक्तांचा विश्वास आहे. त्यानंतर एका गणेशभक्ताने श्री सिद्धिविनायकाची स्थापना कड्यावर केली. गणपती मंदिराचा इतिहास बाराव्या शतकापर्यंत मागे जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे वर्णन शब्दांत करणे तसे कठीणच जाते. श्रीं चे दर्शन घेतल्यानंतर लाभणारी प्रसन्नता आणि शांती या दोन्ही गोष्टी केवळ अनुभवावयच्याच आहेत. गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीवर विलक्षण तेज दिसते. पाच फूट उंचीची व उजव्या सोंडेची ही सिंहासनाधिष्ठित मूर्ती असून बेसॉल्ट पाषाणापासून तिची निर्मिती झाली आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून शेजारी रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत. श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर अर्थात कड्यावरचा गणपती अनेक भक्तांचे श्रद्धास्थान. सभामंडपातून गाभाऱ्याकडे जात असताना श्रींचे रूप विस्तीर्ण होत जाते. या मंदिरात देवदर्शनासाठी पर्यटक भाविकांचा दररोज ओघ असतो.





























































