
संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथील प्रगतशीर शेतकरी बाळकृष्ण काष्ट्ये यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक पूरक व्यवसायाची जोड देत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भातशेती, भाजीपाला व फळबाग शेतीसोबतच कुक्कुटपालन व्यवसायातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली असून परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरत आहेत.
शिक्षण घेत असतानाच बाळकृष्ण काष्ट्ये यांनी शेतीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी घरच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. माभळे गावात केवळ भातशेतीवर उदरनिर्वाह मर्यादित असल्याचे त्यांनी ओळखले आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुमारे ४२ वर्षांपूर्वी संगमेश्वर बाजारपेठेत त्यांनी पहिला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. मनुष्यबळ आणि वेळेची बचत करणारा व्यवसाय असल्याने त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पोल्ट्री फार्म उभारला. आज त्यांच्या कुक्कुटपालन व्यवसायाचा मोठा विस्तार झाला असून, प्रत्येकी १,००० पिल्ले क्षमतेचे पाच पोल्ट्री फार्म त्यांनी उभारले आहेत.
कुक्कुट पालन करत असतानाच त्यांनी पारंपरिक शेतीचा वसा जपला आहे. भातशेतीसोबत भाजीपाला व फळबागांची जोपासना करत त्यांनी शेतीला बहुआयामी स्वरूप दिले आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे सहकार्य लाभले आहे. पत्नी, भाऊ प्रमोद, मुलगा अमित तसेच पुतण्या अंकुर हे सर्वजण शेती व कुक्कुटपालन व्यवसायात सक्रियपणे सहभागी आहेत.
परिश्रम, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावर बाळकृष्ण काष्ट्ये यांनी शेतीतून यशस्वी उद्यमशीलतेचा आदर्श उभा केला असून, आज ते इतर शेतकऱ्यांना नवी दिशा देणारे प्रेरणास्थान ठरत आहेत. बाळकृष्ण काष्ट्ये हे शेती तसेच वेगवेगळे मकर तयार करण्याचीही कला आहे. त्यांनी हाही छंद जोपासला आहे


























































