
अन्न पदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकींगसाठी वर्तमानपत्राचा वापर करु नये. मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा. सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या सेवनामुळे विषबाधा सारखी अप्रिय घटना घडणार नाही याची जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी केले आहे. अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांनी १८०० २२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही प्रकारची तक्रार करावी.असे आवाहन त्यांनी केले आहे.
सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा,मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल,वनस्पती इत्यादीची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याअनुषंगे जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी.
आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीयदृष्टीने व किटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक किंवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. पाणी पिण्यायोग्य असल्याबाबत अहवाल प्राप्त करून घ्यावा. तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकूण ठेवावेत. आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत.
मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा तो १०० पीपीएम पेक्षा कमी वापर करावा. अन्न पदार्थ ग्राहकांना देताना, अन्नपदार्थ वर्तमान पत्राच्या कागदात बांधून देऊ नका. बंगाली मिठाई ही २४ तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अॕप्रन वापरावे. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचा व उच्च प्रतीचा असावा.
मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे. अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेखा ठेवावा. आस्थापनेत कार्यरत अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्याचा अभिलेखा ठेवावा. अन्न आस्थापनेत २५ कर्मचाऱ्यांच्या मागे एक प्रशिक्षित अन्नसुरक्षा पर्यवेक्षक नेमावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.