
शिक्षण घेऊन नोकरीसाठी वणवण भटकायचं, नसेल नशिबात नोकरी तर वडिलोपार्जित गुंठ्यातील शेती करायची. राबणारे हात कमी व खाणारे हात जास्त. त्यातच शेतीवर रानटी प्राणी डुक्कर, गवा, माकडे यांच्याकडून होणारा हल्ला व लहरी हवामान. चार महिन्याचा पावसाळा सहा महिने झाले तरी मागे हटत नाही. यामुळे कोकणातील सामान्य शेतकरी मेटाकुटीला आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली किंजळकर वाडीतील नितीन किंजळकर या युवकाने शेजारच्या घरात नवीन आणलेल्या फ्रिजचे पुठ्ठा कव्हर स्वतःकडे ठेवले व त्या पुठ्याच्या साह्याने काही प्रतिकृती चित्र करावं म्हणून पक्षाचा आकार देऊन आवश्यक तिथे फेव्हिकॉल, स्टेपलर पिना, रंग यांचा वापर करून बऱ्यापैकी पक्षाची प्रतिकृती चित्र तयार केले. ही बातमी त्याच्या वाडीत पसरली व बघणाऱ्यांची गर्दी झाली.
ही प्रतिकृती छान केली आहेस, छानच जमले तुला! आणखी काहीतरी करू शकशील, प्रयत्न कर, हरकत नाही करायला! अशी शाबासकी मिळवण्यात नितीन यशस्वी झाला. बघणाऱ्या लोकांनी दिलेली शाबासकी हीच प्रेरणा घेऊन अनेकांनी सुचवल्याप्रमाणे विविध प्रकारचे साहित्य पुठ्ठा, वेलवेट कापड, फोम, साधे कापड, विविध कलर लेस, टिकल्या, रंग साहित्य, फेव्हिकॉल, तर सांगाडा तयार करण्यासाठी लोखंडी सळ्या, अशा टाकाऊ व विकत वस्तू मिळवल्या. कोकणात अजूनही नमन लोककला, कलापथक उत्तम प्रकारे चालू असल्याने अशा मंडळींनी रत्नागिरी जिल्हाभरातून कोंबडा, गरूड, मोर, लांडोर, गाय, उंदीर अशा प्रकारच्या प्रतिकृती चित्रांची मागणी येण्यास सुरुवात झाली.
सुरुवातीला सांगाडा सळी वेल्डिंगसाठी बाहेर वेल्डिंग शॉपला जावे लागायचे. मग तेही छोटे वेल्डिंग मशीन घेतले व घराच्या समोर अंगणात प्लास्टिक कापड टाकून छप्पर तयार केले व हे काम सुरू केले. दोन फूट उंच व चार ते पाच फूट लांब अशा साधारण मापाचे प्रतिकृती चित्र पूर्ण तयार करायला एक आठवडा लागतो. अशा पूर्ण तयार केलेल्या चित्रांचा मोबदला चांगला मिळत आहे. गेल्या वर्षभरात त्याने या प्रकारची जवळपास ३६ प्रतिकृती तयार करून विकल्या आहेत. आजही त्याच्याकडे हे काम चालू असून सध्या चार ते पाच वेगवेगळी चित्रे मागणीप्रमाणे तयार आहेत. तसेच एखादी मागणी वेळेत पूर्ण करून द्यायची असल्यास वेळेअभावी आपल्याच वाडीतील मुलांना मजुरीवर बोलावून त्यांची ही मदत नितीन घेतो. त्यामुळे तेथील वाडीतील मुलांना पण चार पैसे मिळतात. तसेच नितीनचा भाऊ सचिन सुद्धा या कामात शेती सांभाळून मदत करत असतो.
कष्टाळू नितीनप्रमाणे भाऊ सचिन सुद्धा छोट्या स्वरूपात मेहनतीने मासे विकण्याचा व्यवसाय करतो. सचिन हा आठवड्यातील सोमवार वगळता सर्व दिवशी रोज पहाटे चार वाजता उठून रत्नागिरी येथील जेटीवर पोहोचून मासे खरेदी करून गोळवली व आजूबाजूच्या गावात मासे विकतो. त्याचे ग्राहकही त्याची त्यादिवशी वाट पाहत असतात. गावात काही करता येत नाही. त्यामुळे बाहेरगावी शहरात रोजगार मिळतो हे जरी खरे असले तरी जिद्द व मेहनतीची तयारी असेल व लाज न बाळगता, कोणतेही काम करण्याची वृत्ती असेल तर कुठलाही युवक बेरोजगार राहणारी नाही, हे नितीन व सचिन यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले आहे. तसेच वर्षरभरात जसे सण येत असतात त्याप्रमाणे पूजा आर्चेसाठी हार, फुले, विविध प्रकारची फळे असा स्टॉल उभारून चार पैसे ते प्रामाणिकपणे मिळवत असतात. मे, जून महिन्याच्या हंगामात आंबा, फणस यांचाही स्टॉल उभारतात. त्यांच्या मेहनतीचा आदर्श बेरोजगारांनी घ्यायला हवा.


























































