
हवामानातील बदल आणि अवकाळी पाऊस याचा आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. मार्च महिन्यातील कडक उन्हामुळे मोहोर करपून गळून गेला. त्यामुळे यंदा आंबा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच संपला. यंदाही बागायतदारांच्या वाटय़ाला नुकसानीची ‘बाट’ आली आहे.
अनेक आंबा बागायतदारांचे बागेतील गुरखेही नेपाळला परतले आहेत. यंदा एप्रिल महिन्यात तयार झालेला आंबा एवढीच पुंजी बागायतदारांच्या वाटय़ाला आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱयांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता त्या आश्वासनाकडे आंबा बागायतदार डोळे लावून बसले आहेत.
दरवर्षी बदलत्या हवामानाचा फटका आंबा बागायतदारांना बसतो. यंदाही या दृष्टचक्रातून आंबा बागायतदार सुटला नाही. यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मोहोर आला नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात थोडाफार मोहोर धरला होता. त्याच मोहोरचा आंबा बाजारात आला. मार्च महिन्यात सुमारे 38 ते 40 अंश सेल्सिअस तापमान होते. या तापमानात मोहोर करपून गेला. छोटी पैरी पिवळी पडून गळून गेली. त्यामुळे मे महिन्यात शेवटच्या टप्प्यात येणारा आंबा राहिला नाही. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराचे फळ एप्रिल महिन्यात तयार झाले. तोच आंबा बाजारात आला आहे. त्यामुळे यंदाही आंब्याचे उत्पादन घटले आहे. यंदा अवकाळी पावसाचाही आंबा बागायतदारांना फटका बसला. यंदा हंगामात दोन-तीन वेळा अवकाळी पाऊस झाला.
फळमाशीचा फटका
तयार झालेल्या आंब्याला फळमाशीचा फटका बसला. फळमाशीने मोठय़ा प्रमाणात आंब्याचे नुकसान केले आहे. आंब्याचे कमी उत्पादन आणि त्यात फळमाशीचा प्रादुर्भाव यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था बागायतदारांची झाली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शेतकरी आणि आंबा बागायतदारांची कर्जमाफी करावी अशी आमची मागणी आहे. मंगळवारी आंबा बागायतदारांची महत्त्वपूर्ण बैठक रत्नागिरीत होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरेल. – प्रकाश साळवी, अध्यक्ष, पावस आंबा उत्पादक संघ
सरकारने बागायतदारांच्या तोंडाला पाने पुसली
2023 मध्ये अतिशय अल्प प्रमाणात आंब्याचे उत्पादन आले होते. त्या वेळी नुकसान भरपाईसाठी आंबा बागायतदारांनी आंदोलने केली. आंबा व्यवसायातून उत्पन्न न आल्यामुळे बागायतदारांच्या कर्जाचे हफ्ते थकले होते. बागायतदारांच्या आंदोलनानंतर सरकारने कर्जावरील व्याज भरण्याचे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन हवेत विरले. सरकारने बागायतदारांच्या तोंडाला पाने पुसली. आजही त्या व्याजासाठी बागायतदार लढत आहेत.