
“वस्त्रहरण” या नाटकाचा लंडनच्या भूमीवर झेंडा फडकवल्यानंतरही नाट्यलेखक गंगाराम गवाणकर यांची पाळेमुळे गावच्या मातीत रूजलेली होती. माडबन गावात वास्तव्याला असताना वयाच्या ८३ व्या वर्षी गावातील तरूण कलाकारांना घेऊन “वस्त्रहरण” नाटकाचा प्रयोग करताना तात्या सरपंचाची भूमिका करून तरूणांना लाजवले होते. सोमवारी गंगाराम गवाणकर यांचे निधन झाल्यानंतर गावाकडच्या आठवणींना उजाळा मिळाला.
जीपीओतून निवृत्त झाल्यानंतर गंगाराम गवाणकर आपल्या माडबन गावी राहू लागले. लोक त्यांना प्रेमाने नाना म्हणत असतं. गावी राहत असतानाही त्यांचे लिखाण सुरू होते. गावातील कलाकरांसाठी त्यांनी नाट्यलेखन केले. २०२३ मध्ये माडबन आणि आजूबाजूच्या काही कलाकारांना घेऊन त्यांनी “वस्त्रहरण” नाटकाची तालीम सुरू केली. १९५२ साली गंगाराम गवाणकर माडबनच्या ज्या प्राथमिक शाळेत शिकले त्या शाळेच्या शताब्दी महोत्सवात त्यांनी “वस्त्रहरण”चा प्रयोग सादर केला होता. त्यांनी माडबनमध्ये वास्तव्याला असताना “विठ्ठला विठ्ठला” हे नाटक लिहिले. गावातील कलाकारांना घेऊन त्याचे प्रयोगही केले.
रत्नागिरीतील संकल्प कलामंच नाट्यसंस्थेसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. संकल्प कलामंच सोबत त्यांनी “महापुरुष पावलो” आणि “नटीचं काय?” ही दोन नाटके राज्य नाट्य स्पर्धेत सादर केली. रत्नागिरीच्या कलाकारांना घेऊन “नटीचं काय?” हे नाटक व्यवसायिक रंगभूमीवर आणायचे त्यांचे स्वप्न होते. रत्नागिरीतील अनेक नाट्यलेखक आणि कलाकारांसाठी नाना मार्गदर्शक होते. अनेक कार्यक्रमांना ते उत्साहाने सहभागी होत. वयाच्या ८५ व्या वर्षीही नाटक सादर करण्याची त्यांच्यामध्ये हौस होती. राजापूरच्या कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी व्हावी याकरिता त्यांनी प्रोत्साहन दिले.






























































