दापोली तालूक्यात भगवे तुफान संचारल्याचे अवघ्या दापोली विधानसभा मतदार संघाने गुरूवारी पाहीले. दापोली तालूक्यातील तामोंड या संपूर्ण गावाने मिंधे गटातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात माजी आमदार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यामुळे मिंधे गटाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडले आहे.
विद्यमान मिंधे गटाच्या आमदाराच्या हातून संपूर्ण तामोंड गाव निसुटून गेल्याने असोंड जिल्हा परिषद गटात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक ताकद कमालीची वाढल्याने, माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख संजय कदम यांची तोफ चांगलीच धडाडली. यावेळी आक्रमक होत विविध उदाहरणे देत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. त्याबरोबर रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “किती दिवस खोटे बोलून रेटून न्याल एक दिवस हा सत्याचाच उगवेल आणि तो तामोंडवासीयांनी दाखवून दिला आहे. ही केवळ सुरूवात आहे आगे आगे देखो होता है क्या. सगळ्यांना आता कळून चुकलं आहे. आता सारं गमावलं जातय तेव्हा यांना लाडकी बहीण आठवली. या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभेला दापोलीतून एस.टी.बसेस सोडण्यात आल्या. धमक्या देवून महिलांना सभेसाठी रत्नागिरीत नेण्यात आले. एस.टी.बसेस नेल्याने त्याचा थेट परिणाम हा प्रवाशी वर्गावर तर झालाच शिवाय शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी खेडापाडयातून तालूक्याच्या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. आम्ही कुणबी समाजाला कुणबी समाज भवन बांधण्यासाठी ठरावाने देवू केलेली शासकिय जमीन कोणाच्या दबावामुळे कुणबी समाजाला मिळाली नाही, की कुणबी समाजाला द्यायचीच नव्हती म्हणून देण्यात आली नाही. मी तर आमदार म्हणून निवडून येईनच आमदार म्हणून निवडून आल्यावर पहिल्याच अधिवेशनात दापोली कुणबी समाजाच्या कुणबी समाजाचा प्रश्न विधानसभा अधिवेशनात उपस्थित करून शासकिय जागा मिळवून देण्यात कमी पडणार नाही.” असा विश्वास जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी संजय कदम यांच्या पत्नी सायली कदम, उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, फरमान बटे, नगराध्यक्षा ममता मोरे, उपजिल्हा संघटीका मानसी विचारे, शंकर साळवी, अनंत पाटील, सुभाष घडवले, नगरसेवक आरिफ मेमन, रमेश बहीरमकर, दत्ता भिलारे, विभाग प्रमुख रमाकांत शिंदे, राजेश संसारे, अंकिता बेलोसे, अंकुश कदम, हेमंत साळूखे, अप्पी मोरे आदींसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.