
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळील आरटीओ कॅम्पसमोर सोमवारी सकाळी रिक्षा आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे हातखंबा-पाली मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जखमींना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिघांची प्रकृती स्थिर आहे.
पालीकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. तिथेच कॅम्पमध्ये असणारे आरटीओ विभागाच्या पोलिसांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ हातखंबा येथील जगद्गुगुरू नरेंद्र महाराज नाणीज धामच्या रुग्णवाहिकेमार्फत रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चंद्रकांत रामचंद्र कांबळे (50), मानसी चंद्रकांत कांबळे (46) आणि नितेश गंगाराम कांबळे (40) अशी जखमींची नावे आहेत.





























































