गणपतीपुळे येथील समुद्रात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सवा पाचच्या सुमारास रत्नागिरीत घडली. प्रदीप कुमार (35,मूळ रा.ओडीसा) आणि महंमद आसिफ (29, मूळ रा.उत्तराखंड) अशी समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ठुकू डाकवा (30,रा.पश्चिम बंगाल) याला वाचवण्यात यश आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
JSW कंपनीचे तिघे कर्मचारी रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला गेले होते. तिघेही समुद्रात अंघोळ करण्यासाठी गेले असताना दोघे लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीव रक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले.
दोघांनाही तात्काळ उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेचे माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत. घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला.