
रविवारी (29 जून 2025) रत्नदुर्ग किल्ल्यावरून एक तरूणी खाली पडल्याच्या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली होती. तरूणीला शोधण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले होते. मात्र तरूणीचा शोध लागला नाही. याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली असून सदर घटना ही प्रेमप्रकरणातून झाल्याचे उघडं झालं आहे. हरियाणावरून आलेल्या वडिलांनी किल्ल्यावरुन खाली पडलेल्या मुलीची चप्पल आणि जॅकेट ओळखलं आहे.
सोमवारी (30 जून 2025) रात्री रत्नागिरीतील एका बॅंकेत काम करणाऱ्या तरूणाने पोलीस ठाण्यात येऊन त्या तरूणीने दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन करून रत्नागिरीत आल्याचे सांगितले. ती तरूणी नाशिक वरून रत्नागिरीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन दिवस होऊनही ती तरूणी न आल्याने तरूणी राहत असलेल्या परिसरातील लोकांना संशय आला. त्यांनी चावी घेऊन तिचे घर उघडले तेव्हा एक सुसाईड नोट सापडली. त्यानंतर त्या लोकांनी नाशिक येथील पिंपळगाव बसवंतनगर पोलीस ठाण्यात तरूणी हरवल्याची तक्रार केली.
सुखप्रीत कौर धालिवाल असे त्या तरूणीचे नाव असून ती नाशिक मधील एका बॅंकेत कामाला होती. तिचे वडील प्रकाशसिंग धालिवाल आणि मोठा भाऊ गुरूप्रीत सिंग धालिवाल हे गुरुवारी (3 जुलै 2025) हरियाणा येथून रत्नागिरीत आले. त्यांनी सुखप्रीत कौरची चप्पल, जॅकेट आणि ओढणी ओळखली. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात सुखप्रीत कौरच्या वडील आणि भावाचा जबाब पोलिसांनी घेतला असून तो जबाब पिंपळगाव बसवंतनगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात येणार आहे. सुखप्रीत कौर धालिवाल हिने ज्या तरूणावर प्रेम होते. त्याला भेटण्यासाठी ती रत्नागिरीत आली होती. अद्याप त्या तरूणीचा मृतदेह न सापडल्याने पोलिसांनाही निश्चित पावले उचलता येत नाही.
सुखप्रीत रहात असलेल्या नाशिक येथील तिच्या घरात सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये आपण प्रचंड तणावात असून तो तणाव आपण सहन करू शकत नाही, असे सुखप्रीत कौरने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. सुखप्रीतच्या वस्तू पाहिल्यानंतर प्रकाशसिंग यांना अश्रू अनावर झाले. प्रकाशसिंग यांनी एका तरूणावर संशय व्यक्त केला असून रत्नागिरी शहर पोलिसांना त्या तरूणाबाबत माहिती दिली आहे. रत्नागिरी शहर पोलीस पुढील कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.