
महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी महासंघाने ‘समुदाय साधन व्यक्ती’ यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन द्यावे. माविमने स्थापन केलेल्या प्रत्येक गटाला 30 हजार रुपये फिरता निधी उपलब्ध करून द्यावा, प्रत्येक गटाला 7 टक्के दराने बॅंक कर्ज मिळावे. लोकसंचलित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांना मासिक मानधन व प्रशासकीय खर्चाकरिता 25 लाख रुपये निधी मिळावा या मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या शेकडो महिला कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. समुदाय साधन व्यक्ती म्हणजेच सीआरपी यांना सध्या फक्त आठशे रुपये मानधन मिळते. हे मानधन किमान सहा हजार रूपये तरी मिळावे अशी मागणी करण्यात आली. उमेद प्रमाणे माविम स्थापित गटांना निधी आणि कर्जसुविधा मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा कल्पना रसाळ, रंजना मोहिते, प्रगती पेंढारी, योगिता भाटकर, समृद्धी विचारे, दिप्ती सावंत, शांती म्हस्के, श्रद्धा धनावडे व इतर महिला उपस्थित होत्या.