रत्नागिरी – लग्न समारंभातील गर्दीवर पथकांची करडी नजर ठेवणार – नगराध्यक्ष प्रदीप साळवी

रत्नागिरी शहरात रविवारी 12 कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने रत्नागिरी नगरपरिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील रस्ते व परिसराचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला असून विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करत 500 रूपये दंड वसूली केली जाणार असून लग्न आणि अन्य कार्यक्रमांच्या गर्दीवर नगरपरिषदेचे पथक करडी नजर ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी नागरिक,दुकानदार यांना हात जोडून मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला होता त्यावेळी शहरवासियांनी काळजी घेत कोरोनाच्या प्रसार रोखण्यात यश मिळविले होते.तशीच काळजी पुन्हा एकदा घ्या. सरकारने जाहिर केलेल्या नियमांचे लग्न आणि अन्य समारंभात पालन करा.

लग्न समारंभासाठी 100 जणाच्या उपस्थितीची मर्यादा दिली असून जर शहरातील एखाद्या मंगल कार्यालयात लग्न समारंभात जर 100 हून अधिक जणांची गर्दी झाली तर नगरपरिषदेचे पथक त्यांच्यावर कारवाई करेल असा इशारा प्रदीप साळवी यांनी दिला.कालपासून शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली असून 16 जणांकडून 8 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत स्वःता मास्क वापरून गिऱ्हाईकांनाही मास्कचा वापर करण्याची सूचना करावी. दुकानात सॅनिटायझर ठेलावा.दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. रत्नागिरी शहरातील रस्ते दोन वेळा सॅनिटायझेशन केले जातील.रत्नागिरी शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन साळवी यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष रोशन फाळके, आरोग्य सभापती निमेश नायर, नगरसेवक राजन शेट्ये, बांधकाम सभापती राकेश नागवेकर उपस्थित होते.

रत्नागिरीतील सर्व रस्ते लवकरच पूर्ववत करणार

रत्नागिरी शहरात नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. काही भागात पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून एकदा पाणी पुरवठ्याची चाचणी केल्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित केले जातील. रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करू, असे आश्वासन नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिले.शहरातील पाणी योजना आम्ही लवकरच पूर्ण करून त्यांच्या उद्घाटनाला आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना बोलवू असा टोलाही नगराध्यक्ष साळवी यांनी हाणला. ते म्हणाले की, विरोधकांना सध्या काम नाही त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत सुटले आहेत. आमचं 2021 मिशन ठरले असून रत्नागिरी नगरपरिषदेवर पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साळवी स्टॉप येथे यापुढे कचरा जाळला जाणार नाही. त्या कचऱ्यातून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या